स्व.पल्लवी सरोदे यांच्या स्मरणार्थ जिल्हा माहिती कार्यालयातर्फे कमळ व वॉटर लिली रोपांची लागवड
ठाणे (जिमाका):- शासनाच्या “मिशन-100 डेज्” अंतर्गत शासकीय कार्यांलयांसाठी 7 कलमी कृती आराखडा लागू केला असून त्याअंतर्गत विविध लोकोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या आवारात “टेरेस गार्डन” ही संकल्पना राबविण्याचे नियोजन आहे.
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या स्वीय सहाय्यक स्व.पल्लवी सरोदे यांचे दि.23 मार्च 2025 रोजी अपघाती निधन झाले. “टेरेस गार्डन” उपक्रमाची सुरुवात म्हणून ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाने आज आपल्या कार्यालयाच्या आवारात स्व.पल्लवी सरोदे यांच्या स्मरणार्थ कमळ व वॉटर लिली या रोपांची लागवड केली आहे. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, वृक्षतज्ञ विजयकुमार कट्टी, समाजसेवक मोहन शिरकर आणि जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
“टेरेस गार्डन” ही संकल्पना ठाणे शहरातील वृक्षतज्ञ श्री.विजयकुमार कट्टी यांच्या मार्गदर्शनातून साकारण्यात येत आहे. श्री.विजयकुमार कट्टी हे नागरिकांना डासविरहित परिसर ठेवण्याकरिता तसेच मानवी जीवनाकरिता इतर उपयुक्त झाडांची लागवड करण्याकरिता विनामूल्य मार्गदर्शन करतात. “टाकाऊ झाडांपासून टिकाऊ झाडांची निर्मिती व वृक्ष संवर्धन” हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
ठाणे जिल्हा प्रशासनातील कार्यालये, अधिकारी-कर्मचारी तसेच जिल्ह्यातील विविध हाऊसिंग सोसायट्या, सामाजिक संस्था, सामान्य नागरिकांना जर आपल्या परिसरात रोपांची लागवड करावयाची असल्यास वृक्षतज्ञ विजयकुमार कट्टी (7977513822) यांच्याशी संपर्क साधावा व पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता आपले अनमोल योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी केले आहे.
Post a Comment