जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे महापालिकेमार्फत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

 

ठाणे  : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज शनिवारी ठाणे महापालिका मुख्यालय येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे महापालिका क्षेत्रातील बचत गटातील महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १६० महिलांनी सहभाग घेतला.


महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दीनदयाळ जन आजीविका योजना, समाज विकास विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपायुक्त अनघा कदम यांनी दिली.


या शिबिरामध्ये, महिलांची रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, स्त्रीविषयक आजार व सामान्य तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यकतेनुसार औषधे विनामूल्य देण्यात आली. या शिबिरामध्ये १६० महिलांनी सहभाग घेतला. त्यांच्यापैकी, ८१ महिलांची प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत आयुष्यमान कार्डची नोंदणी करण्यात आली. महापालिकेच्या माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. वर्षा ससाणे यांनी या महिलांचे आरोग्यविषयक समुपदेशन केले.


तसेच, महिलांना 'माझी वसुंधरा अभियान' या महाराष्ट्र शासनाचा शाश्वत पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाच्या उपक्रमाची माहिती उपायुक्त अनघा कदम यांनी दिली.  या उपक्रमांतर्गत महिलांनी 'माझी वसुंधरा शपथ' घेतली. 


या कार्यक्रमात, महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंड, समाज विकास अधिकारी दशरथ वाघमारे, तसेच समाज विकास विभाग व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी ठाणे सिटीझन फाउंडेशन या संस्थेचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत