ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्यावी- खासदार नरेश म्हस्के
कोकणच्या सर्व गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा मिळावा
दिवा-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडले जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या रेल्वे विकासात गेल्या दशकभरात ऐतिहासिक बदल घडले आहेत. ठाणे आणि मुलुंड स्टेशन दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्यावी, दिवा-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी, कोकणच्या सर्व गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा द्यावा, कल्याण-पुणे लोकल करावी, दिवा-वसई लोकल सेवा वाढवावी, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या स्पेशल ट्रेन मध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवाव्यात, अशा आणि प्रवाशांना अनेक सोईसुविधा देण्याच्या विविध मागण्या ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केल्या.
लोकसभेत रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अनुदानित मागण्यांवर चर्चा करतांना ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी, सोईसुविधा आणि त्याचबरोबर नवीन गाड्या सुरू करण्यासंदर्भात आग्रही मागण्या केल्या.
भारतीय रेल्वे ही फक्त एक प्रवासाची सुविधा नाही, तर ती भारताच्या प्रगतीचा वेग आहे. एक ठाणेकर म्हणून माझ्या मनात या मंत्रालयाबद्दल एक विशेष स्थान आहे. कारण आजपासून सुमारे 172 वर्षांपूर्वी भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती. तो ऐतिहासिक क्षण आजही ठाणेकरांच्या आठवणीत जिवंत आहे. आता 170 वर्षांनंतर, देशाची पहिली बुलेट ट्रेनही ठाणे मार्गे मुंबईला जाणार आहे. विशेष म्हणजे मुंबई-ठाणे दरम्यान देशातील पहिली `अंडर सी टनेल' म्हणजे समुद्राखालून जाणारा बोगदा बांधण्याचं ऐतिहासिक काम सुरू झालं आहे. हे आधुनिक तंत्रज्ञान आजपर्यंत फक्त जगभरात केवळ पाच देशांकडे होतं, पण आता भारतही त्या यादीत सामील झाला आहे. हे शक्य झालं ते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी आणि संपूर्ण रेल्वे विभागाच्या अथक प्रयत्नामुळे. त्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचे कौतुक केले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामुळे बुलेट ट्रेनचं काम वेगाने सुरू आहे. पण महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाला `व्हाइट एलिफंट' (निरुपयोगी प्रकल्प) म्हणून हिणवलं होतं. पण महाराष्ट्राच्या जनतेला `स्पीड ब्रेकर' नव्हे, तर `एक्सप्रेसवे' सारखा वेगवान विकास हवा आहे. महाविकास आघाडीचा विकास म्हणजे इंजिन शिवाय धावणारी ट्रेन होती. `भ्रष्टाचार एक्सप्रेस' गतीने ती धावत राहिली आणि खरा विकास प्लॅटफॉर्मवरच उभा राहिला. आज मोदी सरकारच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात रेल्वे क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती होत असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.
महाराष्ट्रातील रेल्वे सेवेला अधिक वेग आणि सुरक्षितता देण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेमंत्र्यांकडे विविध मागण्या केल्या.
कल्याण-पनवेल (कळंबोली मार्गे) लोकल सेवा सुरू करावी. कल्याण-वाशी (ऐरोली मार्गे) लोकल सेवा सुरू करावी जेणेकरून ठाणे स्थानकावरील प्रवाशांचा भार कमी होईल. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते उरण लोकल सेवा सुरू करावी. कल्याण रेल्वे यार्डात जे काम पूर्ण झाले आहे, त्या भागातून लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्यास सुरुवात करावी जेणेकरून लोकल गाड्यांची वाट मोकळी होईल आणि होणारा विलंब टाळता येईल. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरहून महिलांसाठी विशेष लोकल सुरू करावी. सर्व स्थानकांवर स्वच्छ आणि दर्जेदार शौचालयांची व्यवस्था करावी. प्रथम श्रेणीतील महिला डब्यांमध्ये बसण्याच्या जागा वाढवाव्यात. सकाळी व रात्री महिला डब्यांमध्ये महिला सुरक्षा रक्षक तैनात करावेत. अपघातग्रस्त प्रवाशांना तत्काळ सरकारी व खासगी रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत. कल्याण, ठाणे, डोंबिवली येथे ADRM स्तराचे अधिकारी नियुक्त करावेत. ठाणे जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसवावे. रेल्वे उड्डाणपूल व अंडरपास प्रकल्प जलद पूर्ण करावेत. ठाणे आणि मुलुंड स्टेशनच्या दरम्यान नवीन स्टेशनचे काम सुरु आहे हे काम रेल्वे करीत आहे परंतु खर्च ठाणे महानगरपालिका करीत आहे, त्याचा वाढीव खर्च रेल्वेने करावा व अधिकाऱ्यांना तसे निर्देश द्यावेत व नवीन रेल्वेच्या कामाला गती द्यावी. याचबरोबर स्टेशनवरची वन रुपीज क्लिनिक केंद्रे बंद आहेत ती लवकरात लवकर सुरू करावीत. ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण अशा सर्व ठिकाणी ऑटोमॅटिक जिन्यांची सोय करावी, अशा विविध मागण्या खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केल्या.
महाराष्ट्रासाठी 2009-2014 मध्ये केवळ रुपये 1,171 कोटींचं रेल्वे बजेट मिळालं होतं, ते मोदी सरकारच्या काळात तब्बल 20 पट वाढून रुपये 23,778 कोटींवर पोहोचले आहे. राज्यात 2,150 किमी नवीन रेल्वे मार्ग उभारण्यात आले असून, संपूर्ण रेल्वे नेटवर्कचं 100 टक्के विद्युतीकरण झालं आहे. 11 वंदे भारत गाड्या 19 जिल्ह्याना जोडत आहेत. तर अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत 132 स्थानकांचं नूतनीकरण सुरू आहे. 47 मोठ्या प्रकल्पांसाठी रुपये 1,58,866 कोटींची गुंतवणूक आणि 1,062 नवीन उड्डाण पूल व अंडरपासेसने महाराष्ट्राच्या रेल्वे विकासाला नवी दिशा दिली जात असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.
भारतीय रेल्वे आज 68,584 किमीच्या भव्य जाळ्यासह आणि 12.5 लाख कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने देशाच्या प्रगतीचा कणा बनली आहे. महायुती सरकारच्या प्रभावी नेतृत्वाखाली, भारतीय रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क बनले आहे. पण ही केवळ प्रवासाची सुविधा नसून, देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीचा महामार्ग आहे. लोखंडाच्या रुळांवर धावणाऱ्या गाड्यांमध्ये आता भारताच्या स्वप्नांचा वेग आहे. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात ही रेल्वे विकसित भारताच्या भविष्यासाठी एक भक्कम आधारस्तंभ ठरली असल्याचे सांगत
आओ मिलकर देश को बदले,
नई उम्मीदों का संचार करे,
भ्रष्टाचार मिटाकर विकास लाए,
एक विकसित भारत का निर्माण करे।
या शायरीने खासदार नरेश म्हस्के यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
Post a Comment