छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन वाशी चौकातील अश्वारूढ शिवपुतळ्यास वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण ‘जय शिवाजी – जय भारत’ पदयात्रेत नागरिकांसह मोठ्या संख्येने युवकांचा उत्साही सहभाग
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आज विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, परिमंडळ १ विभागाचे उपायुक्त श्री. सोमनाथ पोटरे, शिक्षण विभागाच्या उपायुक्त श्रीम. संघरत्ना खिलारे, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त श्रीम. अभिलाषा म्हात्रे पाटील, वाशी विभागाच्या सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्रीम.अलका महापूरकर, शिक्षणाधिकारी श्रीम.अरूणा यादव, क्रीडा अधिकारी श्री.रेवप्पा गुरव, कार्यकारी अभियंता श्रीम.शुभांगी दोडे, श्री.राजेश पवार, श्री.संजीव पाटील आणि इतर मान्यवर आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपारिक वेशभूषेत युवक – युवतींची लक्षणीय उपस्थिती होती.
केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्त ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा राबविण्याच्या निर्णयानुसार नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण आणि क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विविध शाळा, महाविद्यालयांनी आपापल्या क्षेत्रात पदयात्रांचे आयोजन केले होते. वाशी विभागातील शाळा, महाविद्यालयांनी आपल्या परिसरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पदयात्रा काढून, शिवरायांचा जयजयकार करीत शिवरायांना अनोखी मानवंदना अर्पण केली.
वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थी समुहाने पारंपारिक लेझीम व लाठीकाठी या साहसी खेळाचे प्रदर्शन करीत उपस्थितांची दाद घेतली. इतरही शाळा, महाविद्यालयांनी विविध प्रकारचे पारंपारिक खेळ केले. पारंपारिक वेशभूषेत एकत्र येत नागरिकांनी शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा केला. शिवरायांच्या नामघोषात चौकातील सारा परिसर निनादला होता.
चौकात रंगावलीकार श्रीहरी पवळे यांनी काढलेली छत्रपती शिवरायांची रांगोळी लक्षवेधी होती. अनेकांनी रांगोळी समवेत सेल्फी छायाचित्रे काढली. विशेषत्वाने तरूणाईने चौकातील शिवचरित्रशिल्पकृतींना भेट देऊन शिवरायांचा चरित्रपट जयंतीनिमित्त अनुभवला. शिल्पाकृती वास्तूच्या वरील बाजूस असलेल्या घुमटांवर लावलेल्या शिवरायांच्या विविध भावमुद्रा असणा-या छायाचित्रांमुळे चौकातील वातावरण भारलेले होते.
महापालिका मुख्यालयात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमापूजनासह सांस्कृतिक कार्यक्रमांतून मानवंदना
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील अॅम्फिथिएटर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला तसेच पाचव्या मजल्यावरील राजमाता जिजाऊ सभागृहाच्या प्रवेशव्दाराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, परिमंडळ १ विभागाचे उपायुक्त श्री. सोमनाथ पोटरे, भांडार विभागाचे उपआयुक्त श्री.शंकर खाडे, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त श्रीम. अभिलाषा म्हात्रे पाटील, कार्यकारी अभियंता श्रीम.शुभांगी दोडे, श्री. प्रवीण गाडे, श्री.राजेश पवार, श्री.वसंत पडघन, श्री.प्रशांत देशमुख आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment