नागरिकांनी हक्कांसोबत जबाबदारीचेही भान ठेवावे ठाण्यातील सुयश व्याख्यानमालेतून अनुराधा प्रभुदेसाई यांची देशवासियांना साद



ठाणे ८ (प्रतिनिधी) : आजकाल सर्व जण हक्कांच्या मागे धावत आहेत आणि जबाबदाऱ्या मात्र दुसऱ्यांवर ढकलत आहेत. तेव्हा, मला काय त्याचे, ही वृत्ती सोडून प्रत्येक नागरिकाने हक्कासोबत जबाबदारीचेही भान ठेवावे, अशी साद प्रसिद्ध लेखिका आणि लक्ष्य फाउंडेशनच्या संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई यांनी शुक्रवारी नागरिकांना घातली.

ठाणे पूर्व येथील सुयश कला-क्रीडा मंडळाच्या वतीने शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनातून सुरू झालेल्या व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प अनुराधा प्रभुदेसाई यांनी `तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक' या विषयावर गुंफले. या वेळी शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक भरत चव्हाण, गिरीश राजे, मनसे शहरप्रमुख रवींद्र मोरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सीमेवर देशाचे संरक्षण करणारे तरूण सैनिक ही केवळ बोलायची नव्हे तर, सांगायची गोष्ट आहे. १९९९ मध्ये कारगीलचे युद्ध झाले होते. त्यानंतर २००४ मध्ये मी कारगीलला गेली असताना तेथील एका फलकाने लक्ष वेधुन घेतले. `देशावर ओवाळून टाकायला माझ्याकडे एकच आयुष्य आहे' हा फलक वाचून त्या प्रेरीत झाल्या. तेव्हापासून आजपावेतो सैनिकांप्रती आदरभाव व्यक्त करीत असल्याचे अनुराधा प्रभुदेसाई यांनी प्रारंभी स्पष्ट केले. ऐन विशीतले हे तरुण नागरिकांच्या सुरक्षित भविष्यासाठी आपले वर्तमान देत आहेत. विवेक, नैतिकता, स्थितप्रज्ञता या सैनिकांमध्ये ठासून भरलेली असते. देश व नागरिकांच्या रक्षणासाठी ते आपल्या प्राणांची बाजी लावतात. आपल्याला त्यांच्या आयुष्याबद्दल काहीही माहिती नसते. त्या वीरांबद्दल आपण अनभिज्ञ असतो. तेव्हा, समाजाची ही धारणा बदलली पाहिजे, असे मत व्यक्त करून अनुराधा प्रभुदेसाई यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांकडून सीमेचे संरक्षण कसे केले जाते, त्याबाबतच्या कार्यपद्धतीचे सविस्तर वर्णन केले. त्यावेळी उपस्थित नागरिकांचा ऊर अभिमानाने भरून आला. आतापर्यंत आपण ३० वेळा कारगीलला गेलो सांगून उरी, कॉंगो, कारगिल- बटालिक सेक्टर, पूंछ परिसरासह भारतीय सैन्याच्या विविध तळांना दिलेल्या भेटींदरम्यान आलेले अनुभवही त्यांनी मांडले.

भारतीय राज्य घटनेने आपल्याला हक्क (राईट) व जबाबदारी (रिस्पॉन्सिबिलीटी) हे दोन 'आर' दिले आहेत. परंतु, आपण केवळ हक्कांच्या मागे धावतोय, नागरिक म्हणून आपल्याला अधिकार हवे आहेत. परंतु, जबाबदारी स्वीकारायची आपली तयारी नाही. लोकशाहीचा गाभा असलेल्या विवेकाचा विसर पडून आपल्या जबाबदाऱ्या आपण दुसऱ्यांवर ढकलत आहोत. जे स्वातंत्र्य आपण उपभोगतो, त्याची किंमत आपले सैनिक चुकवित असतात, याची तरी जाणीव ठेवायला हवी, मला काय त्याचे ? या वृत्तीमुळे अनर्थ होतोय, तो होऊ नये, म्हणून प्रत्येकाने हक्कांसोबत जबाबदारीचेही भान ठेवावे, असे आवाहन प्रभुदेसाई यांनी केले. 

सैनिकांच्या समर्पणाला लायक व्हा...

इतिहास काळात प्रत्येकाकडे तलवार होती, पण स्वराज्य निर्मितीची ताकद केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमध्येच होती. तेव्हा,शिस्त, निष्ठा, त्याग, साहस, समर्पण आणि जबाबदारी तरुणांकडे हवी. स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत असलेला स्वप्नातील आदर्श युवा कसा असावा, याच्या २३ बाबी विषद करून त्यांनी, `व्हॅलेंटाईन डे' दिवशी व्यक्त करता ते प्रेम नव्हे, तर सैनिक जे देशावर, मातृभुमीवर करतात ते प्रेम होय. त्यामुळे सैनिकांच्या त्यागाला, समर्पणाला आपण लायक आहोत का ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणे गरजेचे आहे, असे मत अनुराधा प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत