सर्व प्राधिकरणांनी मान्सूनपूर्व कामे 30 एप्रिलपर्यत पूर्ण करावीत : आयुक्त सौरभ राव

 

महापालिका, मेट्रो प्राधिकरण व वाहतूक पोलीसांच्या बैठकीत मान्सूनपूर्व कामांचा आढावा

 


ठाणे  : मान्सूनपूर्व कामे वेळेत व्हावी व सर्व यंत्रणांचा परस्पर संबंध असावा, यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज (30 जानेवारी) सर्व विभागांची बैठक आयुक्त दालनात आयोजित केली होती. महापालिका कार्यक्षेत्रात पावसाळ्यात खड्डयामुळे वाहतूक कोंडी होवू नये यासाठी रस्त्यांची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच खड्डे पडण्याची जी ठिकाणे आहेत त्या ठिकाणी पाहणी करुन सर्व कामे 30 एप्रिलपर्यत करावीत, त्याचप्रमाणे मान्सून कालावधीत काही कारणास्तव खड्डे पडले तर ते तात्काळ दुरूस्त करण्यासाठी यंत्रणा सज्ज असेल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या.

            या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, वाहतूक  विभाग, मेट्रो प्राधिकरण, एमएमआरडीए आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            महापालिका कार्यक्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांसंदर्भात नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सूचना करण्यात आल्या. त्या अनुषंगाने सर्व प्राधिकरणाने आपल्या अखत्यारितील कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत जेणेकरुन पावसाळ्यात कोणत्याही समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागणार नाही या दृष्टीने रहावे असे निर्देश आयुक्त श्री. राव यांनी दिले.

            ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दरवर्षी ज्या ठिकाणच्या रस्त्यांवर, उड्डाणपुलावर खड्डे पडतात त्या ठिकाणी प्रभागसमिती निहाय कार्यकारी अभियंत्यांनी तेथे कॉक्रिटीकरण किंवा अत्याधुनिक पध्दतीने अधिक गुणवत्तापूर्वक काम होईल्‍ किंवा कसे हे पहावे. शहरात विविध ठिकाणी मेट्रो प्राधिकरणामार्फत सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच ज्या ज्या ठिकाणी डेब्रीज पडलेले आहे ते तात्काळ उचलून रस्त्याचा पृष्ठभाग समतोल करण्याच्या सूचनाही आयुक्त श्री. राव यांनी यावेळी दिल्या.

            तसेच मान्सूनच्या अनुषंगाने करावयाच्या कामांसाठी पाहणी करुन करावयाच्या कामांचा आढावा घेणे. ज्या ठिकाणी मेट्रोच्या स्टेशनची कामे सुरू आहेत, पैकी पूर्ण झालेल्या कामाच्या ठिकाणचे बॅरिगेट्स उचलण्यात यावे. माजिवडा, कासारवडवली, गायमुख, डोंगरीपाडा, आनंदनगर, ओवळा जंक्शन, वाघबीळ, कांचनपुष्प सोसायटी, हायपरसिटी मॉल, कासारवडवली फ्लायओव्हर  आदी ठिकाणी मेट्रोच्या गर्डरखाली काम पूर्ण होवून जेथे डेब्रीज पडलेले असल्याचे दिसून येते ते तात्काळ यावे,  तसेच मेट्रो मार्गावर उभारण्यात आलेल्या सर्व पिलरची पाहणी करुन ज्या ठिकाणी खड्डे असतील ते योग्य पध्दतीने बुजविण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही आयुक्त श्री सौरभ राव यांनी या बैठकीत दिल्या.

       त्याचप्रमाणे तत्वज्ञान विद्यापीठ ते मानपाडा जंक्शन येथील सर्व्हिस रस्त्याचे डांबरीकरण करणे, दोस्ती ईम्पीरियासमोर पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी बैठकीत दिल्या.

      महापालिका कार्यक्षेत्रात नागरी विकासातंर्गत सुरु असलेली प्रकल्प कामे निधीअभावी पुर्णत्वास गेलेली नाही अशा कामांबाबतचा अहवाल संबंधित प्राधिकरणांनी तयार करावा. परिवहनमंत्री व स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे आवश्यक निधीबाबत मागणी करुन सदरची कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करता येईल असेही आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.  

       एकूणच विविध प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व प्राधिकरणांनी समन्वयाने कामे करण्याचेही आयुक्त सौरभ राव यांनी सूचित केले. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत