पात्र असलेल्या लाडक्या बहिणींसाठी योजना कायम सुरू राहणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरात जाऊन घेतले आई अंबाबाईचे दर्शन


कोल्हापूर  25 :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या साथीदारांसह करवीरनिवासिनी आई अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेऊन तिची भक्तीभावाने पूजा अर्चना केली. 


राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आई अंबाबाईचे दर्शन घेऊनच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग शिवसेनेने फुंकले होते. आईच्या आशीर्वादाने या निवडणुकीत शिवसेनेला देदीप्यमान असे यश मिळाले. शिवसेनेचे ८० पैकी ६० उमेदवार आमदार म्हणून निवडून आले. या यशाबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आईचे आशीर्वाद घेऊन तिचे आभार मानले. तसेच शक्तीच्या या देवतेकडे राज्यातील सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सुख, आनंद आणि समाधान आणण्याचे काम अविरत सुरू ठेवण्याचे बळ दे एवढेच मागणे मागितले. 


विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोल्हापूर शहरातूनच  महायुतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला होता. आई अंबाबाईच्याच कृपाआशीर्वादाने जनतेने गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामांच्या बळावर पुन्हा एकदा शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी आणि घटक पक्षांच्या महायुतीला जनतेने भरगोस मतांनी निवडून दिले. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, कष्टकरी, कामगार या सर्वानी महायुतिला प्रचंड बहुमताने निवडून दिले. त्यामुळे आता आमची जबाबदारी वाढली असून सर्वसामान्य लोकांना अभिप्रेत असलेला कारभार करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. 


तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही या यशामध्ये गेमचेंजर ठरली असून काहीही झाले तरीही ही योजना बंद होणार नाही. या योजनेसाठी पात्र असलेल्या बहिणींना यातून कुणीही वगळणार नसल्याचे यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले. 

 

यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश अबीटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक, शिवसेना उद्योग आघाडीचे उदय सावंत, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत