ठाणेकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सुरू झाली मराठी राज्य नाट्य स्पर्धा ठाणे केंद्राची प्राथमिक फेरी

 


          5 डिसेंबर 2024 रोजी डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे  येथे सकाळी 11 वाजता 63 व्या महाराष्ट्र राज्य हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा उद्घाटन सोहळा पार पडला. याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी मराठी ग्रंथ संग्रहालय अध्यक्ष विद्याधर ठाणेकर, समीक्षक संतोष पाठारे, नाट्य परिषद पदाधिकारी प्रणाली राजे, दुर्गेश आकेरकर, महेश सावंत पटेल, अभिनेता सुनील तांबट यांनी उपस्थिती दर्शवली. या स्पर्धेचे परीक्षक अंजली केतकर, सुभाष भागवत, रामदास तांबे यांना देखील पाहुण्यांसोबत रंगमंचावर आमंत्रित करण्यात आलं. दीप प्रज्वलन आणि नटराज पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पाहुणे आणि परीक्षकांचे गुलाब पुष्प व पुस्तक रुपी भेट देऊन समन्वयक प्रफुल्ल गायकवाड ह्यांनी स्वागत केले. याप्रसंगी पाहुण्यांच्या वतीने बोलताना  संतोष पाठारे ह्यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले, ‘ठाणे केंद्राला नेहमीच दर्दी नाट्य रसिकांची साथ मिळाली आहे. हा असा भरघोस प्रतिसाद ठाणे केंद्रात नेहमीच पाहायला मिळतो. स्पर्धेच व्यवस्थापन करणारी मंडळी देखील अतिशय उत्साहाने सगळी काम करतात. हौशी नाट्य कलाकारांचा हा उत्साह आणि नाट्य रसिकांचा त्याला हा भरघोस प्रतिसाद असाच पुढच्या सगळ्या नाटकांना मिळो.’ 

स्पर्धेची सुरुवात सकाळी 11.30 वाजता ‘वरदविनायक सेवा संस्था, ठाणे’ या संस्थेच्या ‘कडीपत्ता’ या नाटकाने करण्यात आली. आणि संध्याकाळी 7 वाजता 'ठाणे आर्ट  गिल्ड'  निर्मित 'वेटलॉस' ह्या नाटकाचे  सादरीकरण झाले. दोन्ही नाटकांना नाट्यगृह तुडुंब भरले होते. प्रेक्षकांनी पायर्‍यांवर बसुन नाटकाचा आनंद घेतला. अभिनेते उदय सबनीस, अभिनेत्री लीना भागवत, अभिनेते रमेश वाणी, अभिनेते उमेश जगताप ह्यांनी संध्याकाळच्या नाटकाला उपस्थिती दर्शवली. 63व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या या ठाणे केंद्रात 13 जानेवारी पर्यंत एकूण 24 नाटके सादर होणार आहेत. सगळ्या नाटकांसाठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि उपस्थिती दर्शवावी असा आवाहन ठाणे केंद्र समन्वयक प्रफुल्ल गायकवाड यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत