लोकशाहीचा विजय नव्हे तर ईव्हीएम चा विजय-शिवसेना नेते विनायक राऊत

 


प्रतिनिधी - विधानसभा निवडणुकांमध्ये मिंधे, भाजपने खोके आणि यंत्रणेचा वापर करून मिळवलेला विजय आहे हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे आता झालेला पराभव विसरा, गुजरातच्या लबाडांचे लक्ष आता ठाणे, मुंबई महापालिकेवर असून जागृत रहा आणि कामाला लागा असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी ठाण्यातील शिवसैनिकांना केले.


ठाणे शहर, कोपरी पाचपाखाडी आणि ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवासेना कार्यकर्त्याचा मेळावा खारकर आळी येथील एनकेटी सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला शिवसेना नेते विनायक राऊत यांनी ठाण्यातील गद्दारांचा चांगलाच समाचार घेतला. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये झालेला पराभव पचन करून आगामी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज व्हा असे आवाहन देखील राऊत यांनी केले. चोरांच्या तावडीतून महाराष्ट्र सोडायचा असेल तर एकजुटीने काम करा. महापालिका निवडणुका लागतील तेव्हा लागतील पण निवडणुका कधीही लागू द्या आतापासूनच कामाला लागा आणि ठाणे महानगरपालिकेवर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच भगवा फडकवा असे आवाहन देखील विनायक राऊत यांनी शिवसैनिकांना केले. यावेळी शिवसेना नेते राजन विचारे, अर्थतज्ञ व राजकीय विश्लेषक  विश्वास उटगी, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रवक्ते अनिश गाढवे शहरप्रमुख प्रदीप शिंदे, उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, सहसचिव विश्वास निकम, ठाणे शहर समन्वय संजय तरे, संपर्कप्रमुख महेश नेणे, काँगेसचे जेष्ठ नेते मधु मोहिते, ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटिका रेखा खोपकर, उपजिल्हा संघटिका संपदा पांचाळ, महेश्वरी तरे, आकांक्षा राणे यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..



हे लोक सत्तेला चिकटलेली गोचीड आहेत.


या निवडणूकीत सर्वांनी पाहिले पैसा आणि यंत्रणेचा वापर कसा केले. विधानसभा निवडणुकीत यांनी सरळ मार्गे विजय मिळवलेला नाही. त्यामुळे ही लोक म्हणजे सत्तेला चिकटलेली गोचीड आहे असा घणाघात देखील राऊत यांनी केला. तसेच शिवसेना संपलेली नाही आणि संपवणाऱ्यांची अवलाद देखील जन्माला आली नाही, त्यामुळे घाबरू नका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे रहा असा आवाहन देखील विनायक राऊत त्यांनी ठाण्यातील शिवसैनिकांना दिले.

ईव्हीएममुळे त्यांचा विजय झाला आहे. त्यामूळे खचून जाऊ नका, ठाणे महापालिकेवर हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा भगवा फडकवायला तयार रहा असे आवाहन यावेळी शिवसेना नेते राजन विचारे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले.

ही निवडणूक आपल्याला खूप काही शिकवून गेली. जेव्हा प्रचार करताना आम्ही फिरत होतो. तेव्हा ठाणेकर जोरदार स्वागत करत होते, अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव दिसून आला. मात्र, यामधून समजले हे ठाणे शिवसेनेचे होते आणि पुढे देखील शिवसेनेचेच राहील. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत