दिवाळीत मध्यरात्री पहाटेपर्यंत नवी मुंबईत केलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेची नागरिकांकडून प्रशंसा
दिवाळी सणात नागरिक विविध प्रकारचे साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असल्याने बाजारपेठा व दुकाने गजबजून गेलेली असतात, त्यामुळे कच-याच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे दिसून येते. या अनुषंगाने स्वच्छ, पर्यावरणपूरक, प्लास्टिकमुक्त दिवाळी साजरी करण्याचे दिवाळीपूर्वीच आवाहन करणाऱ्या महापालिका आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीच्या मध्यरात्री पहाटेपर्यंत आठही विभाग कार्यालय क्षेत्रात विशेष स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. नवी मुंबईकर नागरिकांप्रमाणेच नवी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. मिलींद भारंबे यांच्याकडूनही या मोहिमेची विशेष दखल घेत प्रशंसा करण्यात आली आहे.
दिवाळीच्या दिवसात मोठया प्रमाणात फटाकेही वाजविले जात असल्याने रस्त्यावरील कच-यात नेहमीपेक्षा अधिक भर पडल्याचे निदर्शनास येते. यादृष्टीने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके वाजविण्याचे प्रमाण जास्त असल्याने नमुंमपा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली, लक्ष्मीपूजनाच्या रात्री नवी मुंबई महानगरपालिका परिसरात बेलापूर ते दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार तसेच व्यवस्थापन विभागाचे परिमंडळ 1 उपायुक्त डॉ.अजय गडदे व परिमंडळ 2 उपायुक्त श्री.संतोष वारुळे यांच्या नियंत्रणाखाली, 1 नोव्हेंबर रोजी रात्री 11 पासून 2 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत स्वच्छतेची विशेष मोहीम राबविण्यात आली.
या विशेष स्वच्छता मोहीमेकरिता आठही विभाग कार्यालय क्षेत्रात 400 हून अधिक सफाईमित्रांची व पर्यवेक्षकांची विशेष नेमणूक करण्यात आली होती. 12 रिफ्युज कॉम्पॅक्टर वहाने आणि 15 मिनी टिपर वहाने यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीमेत गोळा करण्यात आलेला प्रामुख्याने फटाक्यांच्या कच-यासह इतर कचरा तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी शास्त्रोक्त प्रक्रियेसाठी त्वरित वाहून नेण्याच्या नियोजनाची पद्धतशीर अंमलबजावणी करण्यात आली.
नवी मुंबई शहरात आठही विभागांमधील मुख्य रस्ते, मुख्य चौक, वर्दळीची ठिकाणे, बाजारपेठा अशा नागरिकांची गजबज असलेल्या स्थळांवर तसेच फटाके वाजवतात अशा मोकळ्या ठिकाणी रात्री 11 ते पहाटे 4 या कालावधीत राबविलेल्या या विशेष साफसफाई मोहीमेमध्ये हार, फुले. खादयपदार्थ यांचा 10 टन 500 किलो ओला कचरा तसेच विशेषत्वाने फटाके,कागद, पुठ्ठे, कापड यांचा 20 टन 600 किलो सुका कचरा गोळा करून एकुण 31 टन 100 किलो कचरा स्वतंत्र वाहनांमध्ये तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेण्यात आला.
नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंतच्या कालावधीत सकाळी दिवस उजाडण्याच्या आत ही विशेष साफसफाई मोहीम राबविल्याने सकाळी मॉर्निग वॉकला येणाऱ्या नागरिकांनी स्वच्छ रस्ते, चौक व जागा पाहून महानगरपालिकेच्या 'स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी' या संदेशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहीमेची प्रशंसा केली. पोलीस आयुक्त श्री. मिलिंद भारंबे यांनीही महानगरपालिकेच्या या विशेष दिवाळी स्वच्छता मोहिमेची दखल घेतली. मध्यरात्री व पहाटेपर्यंत ही विशेष स्वच्छता मोहीम नियोजनबद्ध रितीने राबविण्यात आली असली तरी दररोज सकाळी होत असलेली साफसफाई नेहमीप्रमाणेच सुरु असल्याने नागरिकांनी कौतुक करीत समाधान व्यक्त केले.

Post a Comment