नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धेचा अभय आळशी ठरला विजेता
· कनिष्ठ महाविद्यालय गटात अनुष्का गांगल झाली विजयी
· ज्येष्ठ साहित्यिक महेश केळुसकर यांच्या हस्ते झाले पारितोषिक वितरण
· ठाणे, मुंबई, रायगड, पुणे येथून आले स्पर्धक
ठाणे / प्रतिनिधी महाविद्यालयीन विश्वात प्रतिष्ठेची असलेल्या कै. नी. गो. पंडितराव स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वि. ग. वझे महाविद्यालयाचा अभय आळशी हा विद्यार्थी विजयी ठरला आहे. तर, कनिष्ठ महाविद्यालयीन गटात रामनिवास रुईया महाविद्यालयाची अनुष्का गांगल विजयी झाली आहे. स्पर्धेचे यंदाचे ५६वे वर्ष होते. विजयी स्पर्धकांना ज्येष्ठ साहित्यिक महेश केळुसकर यांनी पारितोषिके प्रदान केली.
ठाण्यातील श्री समर्थ सेवक मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणारी कै. नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धा यंदा २८ आणि २९ सप्टेंबर रोजी झाली. या स्पर्धेत पदवी गटात अभय आळशी, वि. ग. वझे महाविद्यालय, मुलुंड याने प्रथम क्रमांक पटकाविला. नियोजित आणि उत्स्फूर्त भाषणासाठी असलेले विशेष पारितोषिकही त्यालाच मिळाले. पुण्याच्या नवलमल फिरोदिया विधि महाविद्यालयातील साईराज घाटपांडे याला दुसरा क्रमांक मिळाला. पुण्याच्या स. प. महाविद्यालयातील रमेश कचरे याला तिसरा क्रमांक मिळाला. तर, दादरच्या कीर्ती महाविद्यालयाची अदिती क्षिरसागर हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
कनिष्ठ महाविद्यालय गटात रामनिवास रुईया महाविद्यालयाची अनुष्का गांगल हिला प्रथम क्रमांक तसेच नियोजित आणि उत्स्फूर्त भाषणासाठी दिले जाणारे विशेष पारितोषिकही मिळाले. दुसरा क्रमांक वि. ग. वझे महाविद्यालयाच्या अलीशा पेडणेकर हिला मिळाला. तिसरा क्रमांक पनवेलच्या सी. के. ठाकूर महाविद्यालयाच्या सम्यक कांबळे याला मिळाला. तर, वि. ग. वझे महाविद्यालयाच्या सानिया मुलाणी हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ साहित्यिक महेश केळुसकर यांनी वक्तृत्व कला हा व्यक्तिमत्व विकासाचा पाया असल्याचे प्रतिपादन केले. सध्याच्या सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाच्या काळात अशाप्रकारेच प्रत्यक्ष सोशल होता येणारे सोहळे कमी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आयोजनात नाविन्य आणून वक्तृत्व स्पर्धेचा ताजेपणा टिकवून ठेवण्याचे आव्हान आयोजकांसमोर असल्याचेही ते म्हणाले. आपल्या भाषेवर आपले प्रभूत्व असलेच पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक ती साधना केली पाहिजे, असेही केळुसकर यांनी सांगितले. मंडळ आणि स्पर्धा समितीचे अध्यक्ष पुंडलिक खामकर यांनी केळुसकर यांचा सत्कार केला. तर, समितीचे चिटणीस डॉ. चैतन्य साठे यांनी त्यांचा परिचय करून दिला.
स्पर्धकांचे परीक्षण डॉ. उषा रामवाणी-गायकवाड, मदन जोशी, मकरंद जोशी आणि डॉ. गायत्री लेले यांनी केले. परीक्षकांचा परिचय समितीचे सहचिटणीस अनिल हजारे आणि समिती सदस्य डॉ. राजश्री जोशी यांनी करून दिला. तसेच, परीक्षकांचा सत्कार मंडळाचे विश्वस्त निशिकांत साठे आणि समिती सदस्य प्रमोद कुलकर्णी यांनी केला. स्पर्धा समितीचे अध्यक्ष पुंडलिक खामकर यांनी प्रास्ताविक केले. पारितोषिकांची घोषणा समितीचे समितीचे सदस्य योगेश भालेराव यांनी केली. समारंभाचे सूत्रसंचालन समिती सदस्य रवींद्र मांजरेकर यांनी केले. तर, ऋणनिर्देश समितीचे चिटणीस डॉ. चैतन्य साठे यांनी केला. हनुमान व्यायामशाळेच्या शिवदौलत सभागृहात रविवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमास स्पर्धक, मंडळाचे सदस्य, पंडितराव सरांचे कुटुंबीय, नागरिक आदी उपस्थित होते.
Post a Comment