ठाणे महानगरपालिका विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होतेय मतदान जनजागृती मोहीम
ठाणे(जिमाका):- आगामी विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने प्रत्येक नागरिकाने निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरातील शाळांमधील विद्यार्थी जनजागृती करीत असून मतदानाचे महत्त्व नागरिकांना पटवून देत आहेत.
ठाणे शहरात टेंभी नाका येथे नवरात्र उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला गेला. ठाण्याची दुर्गेश्वरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवीकडे लाखो भाविक साकडं घालण्यासाठी आणि दर्शनासाठी येत असतात. याचेच औचित्य साधून ठा.म.पा शाळा क्रमांक 7 मधील विद्यार्थ्यांनी टेंभी नाका येथे मतदान जनजागृती अभियान राबविले. देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित सर्व नागरिकांना केले.
घटनेने देशाच्या नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून आपण ते बजावलेच पाहिजे, या विचाराचा प्रचार व प्रसार करण्यासाठी टेंभी नाका येथे नवरात्र उत्सव परिसरात मतदान जनजागृती फेरीही काढण्यात आली.

Post a Comment