अखेर हलक्या वाहनांना मुंबई प्रवेश टोल फ्री
आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जल्लोष..
मुंबईच्या सीमेवरील ठाणे, ऐरोलीसह पाचही टोल नाक्यांवरून हलक्या वाहनांना प्रवेश टोलमुक्त करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे लाखो ठाणेकरांना दिलासा मिळाला असून गेली नऊ वर्षे याकामी पाठपुरावा करणाऱ्या आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात भाजपने जल्लोष केला.
गेली अनेक वर्षे मुंबईत प्रवेश करताना किंवा मुंबईतून बाहेर पडताना पाच टोल नाक्यांवर हलक्या आणि अवजड वाहनांना टोल भरावा लागत होता. त्यामुळे ठाण्यातील आनंद नगर, दहिसर, मुलुंड, वाशी आणि ऐरोली या टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगाच रांगा लागत होत्या. परिणामी वाहतूक कोंडी, इंधनाचा अपव्यय आणि आर्थिक भुर्दंड यामुळे लाखो वाहनचालक मेटाकुटीस आले होते. याबाबत गेल्या नऊ वर्षांपासून आमदार संजय केळकर यांनी विरोधी बाकावर असताना आणि सत्तेत असतानाही अधिवेशनात आवाज उठवला, भाजपाच्या वतीने आंदोलने केली. अखेर आज महायुती सरकारच्या काळात मंत्रिमंडळाच्या बैठकीत या पाचही टोल नाक्यावरील हलक्या वाहनांना टोलमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे आमदार संजय केळकर यांनी स्वागत केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
या निर्णयाबाबत आनंद व्यक्त करण्यासाठी आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोष केला. यावेळी माजी नगरसेवक भरत चव्हाण, परिवहन सदस्य विकास पाटील, सीताराम राणे, राजेश गाडे, महेश कदम, ओंकार चव्हाण, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, टोल मुक्तीबाबत आम्ही गेल्या नऊ वर्षांत वारंवार आंदोलने केली आहेत, अधिवेशनात आवाज उठवला आहे. मात्र आता हलक्या वाहनांना टोल मुक्ती देण्याचा मोठा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे वाहतूक कोंडी दूर होईलच, शिवाय इंधनाची बचत होऊन ठाणेकरांची आर्थिक बचतही होणार आहे. या निर्णयाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ठाणेकरांच्या वतीने आभार मानतो, अशा भावना श्री. केळकर यांनी व्यक्त केल्या.
Post a Comment