50 शाळांतील विद्यार्थ्यांनी रंगविले ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेचे 20 X 30 आकाराच्या कॅनव्हासवर भव्य पेंटींग


 

स्वच्छता ही सेवा पंधरवड्यात स्वच्छता विषयक नानाविध उपक्रम राबवितांना त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सक्रीय सहभागावर विशेष भर देण्यात आला. या करिता महानगरपालिका शाळांसह खाजगी शाळांनाही उपक्रमांमध्ये सहभागी करुन घेउुन विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देत स्वच्छता विषयक जाणीव जागृती करण्यात आली.

यामध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या संकल्पनेतून कॅनव्हास पेंटींग हा अत्यंत अभिनव उपक्रम शालेय स्तरावर राबविण्यात आला. सर्वसाधारणपणे सर्व शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात येते. त्यामध्ये ए फोर किंवा ए थ्री आकाराच्या कागदावर चित्रे काढण्यास सांगितली जातात. मात्र यावेळी आगळ्या वेगळ्या पध्दतीने चित्रकला करण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली.

या अंतर्गत महानगरपालिकेच्या 50 शाळांना मोठया आकाराचे चौकोनी कॅनव्हास देण्यात आले होते. त्यावर ‘स्वच्छता ही सेवा 2024’ तसेच ‘स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता’ ही अक्षरे मोठया स्वरुपात लिहिण्यात आली होती. या अक्षरांच्या आतील भागात बोधचिन्हाप्रमाणे रंग भरावयाचे होते. 50 शाळांमधील प्रत्येक शाळेला मिळालेला भव्य कॅनव्हास पेंटिंगचा भाग त्यांनी विद्यार्थ्यांकडून रंगवून महापालिका मुख्यालयात देण्याबाबत सुचित करण्यात आले होते. या उपक्रमात महानगरपालिकेच्या 50 शाळांमधील इयत्ता 6 वी ते 10 वी मध्ये शिकणा-या 12400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या शाळेला मिळालेल्या कॅनव्हास पेंटिंगच्या भागावरील अक्षरामध्ये सूचित केल्याप्रमाणे रंग भरले. विशेष म्हणजे विद्यार्थी नेहमी लहान ब्रशने चित्र रंगवित असतात, मात्र त्यांना पहिल्यांदाच मोठया ब्रशने चित्र रंगविण्याची संधी मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्साहाने रंगकाम केले.

50 शाळांतील निवडक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला मिळालेला कॅनव्हास पेंटींगचा भाग रंगवून महापालिका मुख्यालयात आणला. हे 50 भाग एकत्रित जोडल्यानंतर ‘स्वच्छता ही सेवा 2024’ आणि ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ ही अक्षरे भव्यतम स्वरुपात साकार झाली.

या माध्यमातून विद्यार्थ्यांनी एकतेतून भव्यतेचे दर्शन घडविले व सर्वांनी मिळून ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेचे बोधचिन्ह रंगवून कॅनव्हासवर भव्यतम स्वरुपात साकारल्याचा आनंद मिळविला. सर्वांनी एकत्र येउुन स्वच्छतेचे चित्र भव्यतम स्वरुपात साकारले जाउु शकते असा संदेशही या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये प्रसारित झाला.

हा 50 X 30 आकाराचा भव्य कॅनव्हास 2 ऑक्टोबर रोजी सिडको एक्झिविशन सेंटरमध्ये जल्लोषात संपन्न झालेल्या स्वच्छता महोत्सव प्रसंगी व्यासपीठासमोर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामुळे कार्यक्रमाची उंची आणखीनच वाढली.  

स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचे बोधचिन्ह 20 फूट X 30 फूट इतक्या मोठया आकारात 50 शाळांतील विद्यार्थ्यांनी रंगवून जणू स्वच्छतेचा एकात्म महोत्सवच साजरा केला.

याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेच्या 57 प्राथमिक व 23 माध्यमिक शाळा आणि 200 हून अधिक खाजगी शाळांमध्ये घेण्यात आलेल्या स्वच्छताविषयक चित्रकला उपक्रमात 44 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी ए फोर आकाराच्या कागदावर स्वच्छता चित्र रेखाटली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत