ठाणे महापालिकेने आयोजित केली होती पर्यावरण स्पर्धा
ठाणे : ठाणे महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण कृती आणि जनजागृती स्पर्धेत गृहसंकुले, शैक्षणिक संस्था, वाणिज्य आस्थापना, औद्योगिक संस्था या चार गटातील वेगवेगळ्या स्वरुपाच्या स्पर्धेत ७० जणांनी एकूण २६ लाख रुपयांची पारितोषिके जिंकली आहेत. 'आंतराष्ट्रीय स्वच्छ हवा दिना'चे औचित्य साधून या पर्यावरण स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि पर्यावरणपूरक चित्रपटांचा महोत्सव यांचे आयोजन आज, बुधवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे करण्यात आले होते.
महापालिका आयुक्त सौरभ यांच्या निर्देशानुसार, ०७ सप्टेंबर या 'आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिना'चे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात पर्यावरण स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
ठाण्याची हवा चांगल्या गुणवत्तेची असावी यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. त्याला नागरिकांच्या सक्रिय सहभागाची जोड मिळाली तर हे उद्दीष्ट लवकर साध्य होईल. पर्यावरण स्पर्धेत सहभागी झालेल्या सगळ्यांनी दिलेला प्रतिसाद आमचा हुरूप वाढवणारा आहे. सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी याप्रसंगी केले. त्यांच्यासह, माजी नगरसेवक गुरूमुख सिंग, परिवहन सेवेचे व्यवस्थापन भालचंद्र बेहरे, उपायुक्त मनोहर बोडके, उप प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ स्नेहा कांबळे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय शेळके, उपनगर अभियंता विनोद पवार,मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, पर्यावरण दक्षता मंचाच्या अध्यक्ष डॉ. मानसी जोशी आणि विद्याधर वालावलकर, पोलिस निरिक्षक गौरी मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरण स्पर्धेचे प्रयोजन
राज्य शासनाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या 'माझी वसुंधरा अभियान 1.0' मध्ये ठाणे महानगरपालिकेस अमृत शहराच्या गटात प्राप्त झालेल्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाच्या रकमेतून या पर्यावरण कृती आणि जनजागृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील गृहसंकुले, खाजगी आणि महापालिकेच्या शैक्षणिक संस्था, वाणिज्य आस्थापना, औद्योगिक संस्था, महाविद्यालये यांनी सहभाग घेतला. त्यात सर्व नऊ प्रभाग समिती स्तरावर गुणांकन करून स्पर्धेतील गुणानुक्रमे तीन विजेते निवडण्यात आल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली.
स्पर्धेचे स्वरुप
पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धा, जनजागृती स्पर्धा अशा दोन स्वरुपात स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धा ही संस्थात्मक पातळीवर तर, जनजागृती स्पर्धा सर्व ठाणेकरांकरिता खुली होती. पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धेमध्ये विजेत्यांना प्रत्येक प्रभाग समितीक्षेत्रात रु. ५१ हजाराचे प्रथम
पारितोषिक, रु. २१ हजाराचे द्वितीय पारितोषिक व रु. ११ हजाराचे तृतीय पारितोषिक देण्यात येत आहे. जनजागृती स्पर्धेकरिता महापालिका स्तरावर रु. एक लाखाचे प्रथम पारितोषिक, रु. ५१ हजाराचे द्वितीय पारितोषिक व रु. २१ हजाराचे तृतीय पारितोषिक देण्यात आले आहे. विवेक कोरलेकर, श्रीपाद भालेराव आणि सुरेश देशपांडे यांनी या स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले. तर, पर्यावरण दक्षता मंचतर्फे डॉ. जयश्री कुलकर्णी, संध्या टेंभे, अंजली दांडेकर, प्रिती काजरोलकर, मनीषा मोडक यांनी काम पाहिले.
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे ०७ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षाची संकल्पना स्वच्छ हवेसाठी गुंतवणूक (#investincleanair) अशी आहे. त्यानिमित्ताने, ठाणे महापालिकेतर्फे मुख्यमंत्री हरित अभियानात नुकतीच एक लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली. तर, स्मशानभूमींमध्ये महापालिके ने गॅसवर आधारित व्यवस्थाही विनामूल्य उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांनी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करून हवेची गुणवत्ता चांगली ठेवण्यास महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन यानिमित्ताने अतिरिक्त आय़ुक्त रोडे यांनी केले.
.jpeg)
Post a Comment