प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
अवजारे व साधने यांचा वापर करुन तसेच हातांनी काम करणाऱ्या पारंपारिक कारागीर आणि हस्तकलेतील लोकांना ओळख प्राप्त करुन देण्यासाठी आणि त्यांना सर्वांगीण आधार देऊन त्यांचा विकास करण्यासाठी भारत सरकारने ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना सुरु केली आहे. हस्तकलेतील उत्पादनांची गुणवत्ता, व्याप्ती आणि पोहोच सुधारणे आणि त्यांच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना बाजारपेठ मिळवून देऊन त्यांचे मूल्य साखळीसोबत एकत्रीकरण करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
यामध्ये लाभार्थ्यांना प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाणार आहे तसेच टूलकिट प्रोत्साहन, कौशल्य विकास प्रशिक्षण भत्ता, सवलतीचे आणि तारण-मुक्त कर्ज, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन, विपणन सहाय्य आदी लाभ मिळणार आहे.
या योजनेमध्ये सुतार, सोनार, चांभार, लोहार, गवंडी, मुर्तीकार, धोबी, शिंपी, कुंभार, हार-तुरे तयार करणारे कारागीर, नाभीक, विणकर, चटई-झाडू बनविणारे कारागीर, दोऱ्या वळणारे कारागीर, होडया बांधणारे कारागीर, मासेमारीचे जाळे बनविणारे कारागीर, कुलुप तयार करणारे कारागीर, पारंपारिक खेळणी बनविणारे कारागीर आदी कारागीरांना या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे.
लाभार्थी नोंदणी करिता बायोमेट्रिक प्रमाणीकृत आधार कार्ड आधारित प्रधानमंत्री विश्वकर्मा पोर्टलद्वारे https://pmvishwakarma.gov.in नोंदणी करावयाचे आहे तसेच सामान्य सेवा केंद्रांद्वारेही (CSCs) नोंदणी करता येईल.
नोंदणीसाठी कारागीराचा मोबाईल क्रमांक हा आधारकार्डशी लिंक असावा तसेच कुटुंबातील सदस्यांचे आधारकार्ड असावे व बँक पासबुक आणि रेशनकार्ड आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कर्ज घेतले असल्यास त्याची माहितीही सादर करणे गरजेचे आहे.
या योजनेची माहिती नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पात्र कारागीरांपर्यंत पोहचविण्यासाठी महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाने नियोजनबध्द कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त् डॉ. कैलास शिंदे यांनी दिलेले असून त्यानुसार समाजसेवक व समुहसंघटक यांच्या माध्यमातून क्षेत्रीय स्तरावर पारंपारिक काम करणारे व हस्तकलेतील कारागीर यांच्यापर्यंत पोहचून पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
तरी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अवजारे व साधने यांचा वापर करुन तसेच हातांनी काम करणाऱ्या पारंपारिक कारागीरांनी आणि हस्तकलेतील कारागीरांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन समाजविकास विभागाच्या वतीने करण्यात येत आहे..

Post a Comment