ठाणे महापालिकेच्या स्वच्छतादूतांनी अनुभवला त्यांच्याच जगण्यावरील नाट्यप्रयोग
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील साफसफाईची कामगिरी अथकपणे करणाऱ्या स्वच्छतादूतांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्याच जीवनावरील 'अंधे जहां के अंधे रास्ते' या नाट्यकृतीचा प्रयोग मंगळवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात अनुभवला.
'स्वच्छ सर्वेक्षण - २०२४'मध्ये ठाणे महापालिकेतर्फे सफाई कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रम, शिबिरे यांचे आयोजन करण्यात येत आहे. याच मालिकेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवनाचा वेध घेणाऱ्या या नाट्यकृतीचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. त्याला स्वच्छता कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबियही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांनी या सगळ्यांशी संवाद साधला. त्यांना महापालिका कर्मचाऱ्यांसाठी करीत असलेल्या योजना, उपक्रम यांची माहिती दिली. शहराच्या स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही याप्रसंगी डॉ. शिंदे यांनी सांगितले.
ठाण्यातील अस्तित्व या संस्थेने उन्मुक्त कलाविष्कार या नाट्य समूहाच्या माध्यमातून हे २५ कलाकारांचा संघ 'अंधे जहां के अंधे रास्ते' हा नाट्यप्रयोग करतो. त्याचे लेखन आणि दिग्दर्शन ऊर्मी उर्फ अॅड. शिल्पा सावंत यांचे आहे. तसेच, उपस्थितांनी स्वच्छतेची सामुहिक शपथही घेतली. सर्व कला कारांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवनपट नेमकेपणाने साकारला. तन्मयतेने काम करून उपस्थित स्वच्छतादूत आणि त्यांचे कुटुंबीय यांची दाद मिळवली.

Post a Comment