आशियातील सर्वात मोठया एपीएमसीच्या पाचही मार्केटमध्ये 4 हजारहून अधिक नागरिकांनी राबविले महास्वच्छता अभियान

 


           

      आशियातील सर्वात मोठया एपीएमसी मार्केटमध्ये लोकसहभागातून नवी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये नमुंमपा व एपीएमसी अधिकारी, कर्मचारी यांच्यासह लोकप्रतिनिधी, स्वच्छताकर्मी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, युवक, विद्यार्थी आणि स्वच्छताप्रेमी नागरिक यांनी 4 हजारहून अधिक मोठया संख्येने सहभागी होत हे भव्यतम अभियान यशस्वी केले.

यामध्ये विशेषत्वाने विविध महाविद्यालयांचे एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याप्रमाणे एपीएमसी मार्केटमध्ये काम करणा-या माथाडी कामगारांनी ते ज्या मार्केटमध्ये काम करतात तेथील स्वच्छता मोहीमेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छतामित्र तसेच एपीएमससी मार्केट्सचे स्वच्छताकर्मी यांनीही अभियान यशस्वी करण्यात योगदान दिले. विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व सदस्यही मोठ्या संख्येने या स्वच्छता मोहीमेत सक्रिय सहभागी झाले.  

एपीएमसी मार्केट मधील कांदा बटाटा मार्केट येथे अभियानाचा शुभारंभ करताना महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांच्यासह उपस्थितांनी स्वच्छता व प्लास्टिकमुक्तीची सामुहिक शपथ ग्रहण करीत स्वच्छतेस प्रारंभ केला. भाजीपाला मार्केट, फळ बाजार, मसाला मार्केट, दाणा बाजार अशा पाचही मार्केटमध्ये सखोल स्वच्छता मोहीम व्यापक जनसहभागातून राबविण्यात आली.

17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत संपूर्ण देशभरात ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा साजरा करण्यात येत असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने व्यापक लोकसहभागावर भर देत दररोज विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियान अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवितांना त्यामध्ये विद्यार्थी सहभागावर भर दिला जात आहे.

या अभियानाचा एक भाग म्हणून दुर्लक्षित स्थानांच्या सखोल स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात असून संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशाला अन्नधान्य, फळे व भाजीपाल्याचा दैनंदिन पुरवठा करणा-या एपीएमसी मार्केट्सच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याच्या भूमिकेतून आयुक्तांच्या संकल्पनेनुसार मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सहयोगाने पाचही बाजारपेठांमध्ये सखोल स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले.

ज्या ठिकाणाहून अन्नधान्य, भाजी, फळ पुरवठा होतो अशा मार्केटमधील स्वच्छता ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट असल्याचे अधोरेखीत करीत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्वच्छता ही दैनंदिन जीवनात अंगिकारण्याची गोष्ट असल्याने त्यादृष्टीने नागरिकांनी स्वच्छता ही आपली सवय, आपला स्वभाव बनवावा असे आवाहन केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छताकर्मींप्रमाणेच एपीएमसी मार्केटमधील स्वच्छताकर्मींच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आरोग्य तपासणी शिबिराचे तसेच तंबाखूमुक्ती जनजागृती शिबिराचे आयोजन महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल असेही आयुक्तांनी सांगितले.  

या पाच मार्केटमध्ये नेहमीच व्यापारी, पुरवठादार व ग्राहक यांची नेहमीच मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. भाजीपाला मार्केटमध्ये तर रात्री 12 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी असते. फळ मार्केट आणि कांदा बटाटा मार्केट मध्येही सकाळी 8 वाजल्यापासूनच संध्याकाळपर्यंत वर्दळ असते. मसाला मार्केट व दाणा बाजारही सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत गजबजलेले असते.

 

 

याठिकाणी केवळ एमएमआर क्षेत्रातूनच नव्हे तर राज्याच्या तसेच देशाच्याही विविध भागांतून साधारणत: प्रतिदिन 3 हजार मालवाहू ट्रक ये-जा करीत असतात. साहित्य लोडींग – अनलोडींग अशी प्रक्रिया याठिकाणी सातत्याने सुरू असते. अशाप्रकारे दररोज 40 हजारापर्यंत नागरिक 5 मार्केट्सना भेटी देतात, अशा सदोदीत गर्दीच्या ठिकाणी साफसफाई करणे हे एकप्रकारे आव्हानच आहे. यादृष्टीने पाचही मार्केट्समध्ये लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  

या महास्वच्छता अभियानामध्ये महानगरपालिकेच्या वतीने मॅकेनिकल स्विपींग मशीन, जेटींग मशीन, डस्ट सप्रेशन व्हेईकल, सक्शन युनीट, जेसीबी, डम्पर, कचरा संकलनाच्या घंटागाड्या आदी वाहनांचाही वापर करण्यात आला. जेटींग मशीनव्दारे एपीएमसी मार्केट परिसर स्वच्छ करण्यात आला. विशेषत्वाने भाजीपाला मार्केटमधील  प्लॅटफॉर्मची सफाई करण्यात आली. त्यासाठी प्रक्रियाकृत पाण्याचा वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे निर्जंतुकीकरणही करण्यात आले. अडगळीच्या जागांचीही सफाई करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले.

यावेळी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी एपीएमसीचे सचिव डॉ.पी.एल. खंडागळे यांच्यासह भाजीपाला मार्केटची अंतर्गत व परिसर पाहणी करुन त्याठिकाणी नियमित स्वच्छता राहील अशाप्रकारे सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना केल्या.

या मोहीमेमध्ये नमुंमपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांच्यासह माजी मंत्री श्री.शशिकांत शिंदे, माजी आमदार श्री. संदीप नाईक, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.अशोक डक व सचिव डॉ.पी.एल. खंडागळे, नमुंमपा अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व श्री.शिरीष आरदवाड, एपीएमसीचे सहसचिव डॉ.महेश साळुंखे पाटील व संचालक श्री.अशोक वाळुंज व श्री.शंकरशेठ पिंगळे, माजी नगरसेवक श्री.चंद्रकांत पाटील व श्री.विशाल डोळस, नमुंमपा घनकचरा विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्री.संतोष वारुळे तसेच इतर विभागप्रमुख, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

       ‘स्वच्‍छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये उदया 25 सप्टेंबर रोजी नमुंमपा क्षेत्रातील प्रार्थना स्थळांची विशेष स्वच्छता मोहीम संबधित विभाग कार्यालयांच्यामार्फत राबविण्यात येणार असून नागरिकांनी आपापल्या भागातील स्वच्छता मोहीमेत सक्रीय सहभागी घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत