विशेष मुलींनी मनोरुग्णांना राखी बांधत साजरे केले रक्षाबंधन
- ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात जागृती पालक संस्थेकडून अनोखा सोहळा
ठाणे, (प्रतिनिधी) : रक्षाबंधन म्हटलं की भावाबहिणीच्या अनोख्या नात्याचा सण...या सणाच्या निमित्ताने ठाण्यातील जागृती पालक संस्थेच्या विशेष मुलींनी शनिवारी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्णांना राख्या बांधल्या. विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या २२ वर्षांपासून काम करणाऱ्या जागृती पालक संस्थेच्या विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या मनोरुग्णांच्या हातावर बांधताच उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
ठाण्यातील जागृती पालक या विशेष मुलांची संस्था वर्षभरात प्रत्येक सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करते. गेल्या अनेक वर्षांपासून रक्षाबंधन सण संस्थेच्या वतीने उत्साहात साजरा केला जातो. याआधी अग्निशमन दल, टीडीआरएफच्या जवानांना, सफाई कर्मचारी आणि वाहतूक पोलिस, ज्येष्ठ नागरिकांना राख्या बांधून या विशेष मुलींनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला होता. यंदा जागृती पालक संस्थेच्या शेजारी असलेल्या ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांना विशेष मुलींनी राख्या बांधल्या. या कार्यक्रमात संस्थेतील विद्यार्थी - विद्यार्थिनी, पालक व मनोरुग्णालयातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. घरापासून दूर असलेल्या या मनोरुग्णांना भेटण्यासाठीही अनेकदा नातेवाईक येत नाहीत. मात्र या रक्षाबंधन सोहळ्याच्या निमित्ताने जागृती पालक संस्थेच्या विशेष मुलींचा आनंद द्विगुणित झाल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष संजीवन जाधव यांनी सांगितले. मनोरुग्णालयाचे अधीक्षक नेताजी मुळीक यांचे विशेष सहकार्य याबाबत लाभल्याचेही जाधव यांनी नमूद केले. याप्रसंगी उप अधीक्षक प्राची चिवटे, समाजसेवा अधीक्षक श्रीषा कुलकर्णी, सतीश वाघ, डॉ. विजया खांडेपारकर, संस्थेचे उपाध्यक्ष संजीवन जाधव, प्रल्हाद चौधरी उपस्थित होते.

Post a Comment