कोळी बांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात साजरा झाला नारळी पौर्णिमा उत्सव
ठाणे, : ठाणे महानगरपालिका आयोजित नारळी पौर्णिमेचा सण आज ठाण्यातील कोळी बांधवासमवेत उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत कोळी बांधव या उत्सवात सहभागी झाले होते.
यावेळी माजी उपमहापौर पल्लवी कदम, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
कळवा खारटन रोड येथे उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर कोळी बांधवांनी पालखीचे विधीवत पूजन केले, तसेच समुद्राला अर्पण करण्यात येणा-या नारळाचे पूजन करून कळवा विसर्जन घाटापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत कोळी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कळवा विसर्जन घाट येथे पालखीची मनोभावे पूजा करुन पालखीतील नारळ कळवा खाडी येथे अर्पण करण्यात आले.
नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा पारंपरिक सण. दर्याला नारळ अर्पण करून कोळी बांधव मासेमारीस सुरूवात करतात. दरवर्षी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून हा नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो या बद्दल कोळी बांधवांनी महापालिकेचे आभार व्यक्त केले. यावेळी पारंपारिक कोळी नृत्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
----
फोटो ओळ :
*नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त पालखीतील कलशाचे पूजन करतांना अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे.
*कळवा विसर्जन घाटापर्यंत काढण्यात आलेल्या पालखी मिरवणूकीत सहभागी झालेले कोळी बांधव.
*कळवा खाडी येथे नारळ अर्पण करताना माजी उपमहापौर पल्लवी कदम, अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी व कोळी बांधव

Post a Comment