शालेय विद्यार्थ्यांनी साकारली शाडूच्या मातीतून गणेशाची विविध रुपे*




गणेशोत्सव २०२४ अंतर्गत ठाणे महापालिकेचा उपक्रम


               *ठाणे :* शाडूच्या मातीतून गणपतीच्या विविध रुपातील मूर्ती शालेय विद्यार्थ्यांनी साकारल्या आहेत. निमित्त होते ठाणे महापालिका आणि पर्यावरण दक्षता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळांचे.


              पर्यावरणपूरक गणेशोत्सव २०२४ या उपक्रमामध्ये महापालिकेच्या पर्यावरण विभागाने शाडूच्या मातीच्या मूर्तीचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यातच, विद्यार्थ्यांच्या कार्यशाळांचाही समावेश होता. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आयोजित करण्यात आलेल्या महापालिकेच्या १९ क्रमांकाच्या शाळेतील प्रदर्शनानंतर विभागाने विविध शाळांमध्ये शाडू मातीपासून मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळांचे आयोजन केले होते. त्यालाही शाळा आणि विद्यार्थी यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली.


             नौपाड्यातील सरस्वती सेकंडरी शाळा, दिवा येथील महापालिका शाळा क्र. ७९ आणि ९८, महापालिका शाळा क्रमांक ६४ येथे झालेल्या या कार्यशाळांमध्ये ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शाडूच्या मातीतून साकारलेली गणेशाची विविध रुपे या विद्यार्थ्यांनी घरी नेली. पर्यावरण दक्षता मंचाच्या स्वयंसेवकांनी या विद्यार्थ्यांना माती वापर, त्यापासून मूर्तीला आकार देणे, त्यासाठी वापरायचे नैसर्गिक रंग याची माहिती दिली. तसेच, एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबतही त्यांना माहिती देण्यात आली. 


              

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत