ठाणे शहरातील मुलींना मिळणार स्वयं रक्षणाचे विनामूल्य धडे.
नगरसेविका रुचिता राजेश मोरे यांच्या वाढदिवसानिमीत्त स्तुत्य उपक्रम
सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीपासून ते भयावह अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर, भीतीच्या छायेत वावरणाऱ्या ५ ते १५ या वयोगटातील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे गिरविण्याची संधी मिळणार आहे. समाजात दैनंदिन घडणाऱ्या अनेक विघातक घटनांपासून "स्त्री" म्हणून आपणच आपले स्वसंरक्षण करणे ही काळाची गरज आहे. "स्त्री ही अबला नसून सबला आहे." या वैचारिक जाणीवेतून ठाणे शहरातील मुलींना स्वयं सुरक्षेचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर शिबिराचे आयोजन पांचपाखाडी परिसरातील मा.नगरसेविका रुचिता राजेश मोरे यांनी केलेले आहे. या शिबिराचा कालावधी एक महिना असून ते कचराळी तलाव, ठाणे महानगरपालिका समोर या ठिकाणी घेण्यात येत आहे.
या शिबिरात मुलींना लाटी काठी, तलवार बाजी, मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. छेडछाडीच्या घटनांमध्ये महिलांना विरोध करण्याचे योग्य तंत्र माहित नसल्याने त्यांना अशा प्रसंगांचा सामना करावा लागतो. मात्र महिलांच्या जवळील ओढणी, पिन्स, कंगवा, सौंदर्य प्रसाधने आदी अनेक वस्तूंचा वापर स्वसंरक्षणासाठी करणे शक्य आहे. या सर्वांच्या योग्य वापरातून स्वसंरक्षण कसे करता येईल, याचे प्रशिक्षण मुलींना या शिबिराच्या माध्यमातून घेता येईल.
छेडछाडीच्या प्रसंगांमुळे अनेकदा महिलांचे मानसिक स्वस्थ्य ढासळते, आत्मविश्वास कमी होतो, त्याचा कुटुंबियांवरही परिणाम होतो. त्यामुळे अशा कठीण प्रसंगांचा सामना केल्यानंतर मनाचा संयम ढळू न देता खंबीरपणे त्यातून मार्ग कसा काढावा, याविषयी समुपदेशक देखील या शिबिरात करण्यात येणार आहे. तसेच महिला अत्याचाराविरोधीचे कायदे, त्यांचा वापर, कुटुंबियांची साथ, स्वसंरक्षणाचे मार्ग अशा अनेक विषयांवर मार्गदर्शक प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चर्चा करतील. आज शिबिराचे प्रात्याक्षिक कचराळी तलाव या ठिकाणी देण्यात आले. त्यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया देविदास ढमाले यांनी उपस्थित मुलीं व महिला यांना स्वयं सुरक्षेसाठी काय केलं पाहिजे याबद्दल समुपदेशन केले. जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलींना या शिबिरात सहभागी करून घ्यावे अशी विनंती आयोजक राजेश मोरे व रुचिता मोरे यांनी केली. शिबिरात सहभागी होण्यासाठी मा. नगरसेविका रुचिता राजेश मोरे यांच्या कार्यालयात नोंदणी करावी.
Post a Comment