महिला व मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या,श्रमजीवी संघटनेची मागणी
चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक निदर्शने
ठाणे दि : महिला व मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाविरोधी फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये निर्णय घेवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गशनाखाली माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती शेतकरी घटक संतोष गावित यांच्या नेतृत्वाखाली श्रमजीवी संघटनेच्या वतीने ठाण्यातील चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक निदर्शने करण्यात आली व पोलिसांना निवेदन देण्यात आले.
पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर व अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची प्रकरणं वाढत आहेत. लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. लहान लहान चिमुकल्या मुलींवर तर कधी दिव्यांग मुलींवर अत्याचाराचे प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत. हे शासनाला शोभणारं नाही. अशा नराधम विकृत प्रवृत्तीला कायद्याचा धाक राहिलेला नाही. त्यासाठी शासनाकडे ठोस कारवाई करण्याचे धोरण नाही.बदलापूर येथे एका ४ व ६ वर्षाच्या चिमुकल्यांवर त्याच शाळेतील सफाई कर्मचारी हैंवानाने लैंगिक अत्याचार करुन मानवतेला काळीमा फासणारे कृत्य केले. तर त्याच दरम्यान कळवा (ठाणे) येथे एक दिव्यांग मुलगी रस्ता क्रॉस करीत असतांना एका नराधमाने तिचा विनयभंग केला. तर पुणे येथे नामांकित शाळेमध्ये शिक्षकाने मुलींचा विनयभंग केला. तसेच नालासोपारा, अंबरनाथ येथेही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. रोज अशा असंख्य घटना अल्पवयीन मुलींवर व महिलांवर या पुरोगामी महाराष्ट्रात होत आहेत.तर कोलकत्ता येथील आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये ट्रेनी महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार करुन तिची निघृण हत्या करण्यात आली.कुठल्याही क्षेत्रात महिला व मुली सुरक्षित नसून महिला व मुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व घटनांचा श्रमजीवी संघटना जाहिर निषेध करीत लैंगिक अत्याचार व बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा लवकरात लवकर शासनाने करावा, महिला व अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांच्या विरोधी फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून त्यांना फाशी देण्यात यावी.तरच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासनाने ठोस उपाययोजना आखावी. अशा मागण्या श्रमजीवी संघटनेने केली आहे.

Post a Comment