आरोपीची ठाणे कारागृह ते घरापर्यंत काढली मिरवणूक ,सोशल मीडियावर रिल्स व्हायरल

 


राजीव डाके 

ठाणे,


पुण्यातील येरवडा कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यावर एका कुख्यात गुंडाची त्याच्या साथीदारांनी काढलेली मिरवणूक गाजत असतानाच ठाण्यातही पुण्याचा हा मिरवणूक पॅटर्न पाहायला मिळाला. मंगळवारी (ता.३०) ठाणे मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका आरोपीची त्याच्या गुंड साथीदारांनी  बाईक रॅली काढली. कारागृहात बाहेर हुल्लडबाजी केली. विशेष म्हणजे कारागृहापासून अगदी हाकेच्या अंतरावर पोलिस आयुक्त बसलेले असतानाही सामन्यांमध्ये दहशत पसरवणारा हा संतापजनक प्रकार घडला. यावरून ठाणे पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक नसल्याचे चित्र समोर आले आहे.


पुण्याला विद्येचे माहेर घर म्हटले जाते. पण गेल्या काही वर्षांपासून तेथे टोळी संस्कृती उदयाला आल्याचे दिसते आहे. आता ही टोळी संस्कृती ठाण्यात सुध्दा येऊ पाहत आहे. मंगळवारी ठाणे कारागृहासमोर त्याची झलक पाहायला मिळाली. खुनाच्या प्रयत्नांत कारागृहात गेलेल्या एका आरोपीची जामिनावर सुटका झाल्यानंतर तो कारागृहातून बाहेर येताच त्याची वाट पाहत बसलेल्या तरुणांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. कारागृहाच्या बाहेर येताच त्याला खांद्यावर उचलून घेण्यात आले. त्यानंतर त्याला अलिंगणे देऊन मोटर सायकलवर बसवून, मोठ्या आवाजात घोषणा देत, हुल्लडबाजी करत शहरातून मिरवणूक काढली. सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. विशेष म्हणजे ठाणे मध्यवर्ती कारागृहापासून जवळच पोलिस आयुक्त, पोलिस उप आयुक्त, पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायालय अशी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पाळणारी दिग्गज यंत्रणा वसलेली आहे. कारागृहाच्या गेट समोरच पोलिस उप आयुक्त, सहायक पोलिस आयुक्त, शीघ्र कृती दलाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांची कार्यालये आहेत. पण त्यांच्या समोरच हा चीड आणणारा प्रकार घडत होता. त्यांच्या नाकावर टिच्चून या भाईचा मोटर सायकलचा ताफा कर्कश हॉर्न, मोठ मोठ्याने घोषणा देत पुढे निघून गेला. मात्र तरीही या अधिकाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यांची ही भूमिका गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढवणारी ठरू शकते. संतापाची बाब म्हणजे अभिषेक यादव नामक या नवख्या आरोपीची कारागृहातून बाहेर येताना, त्याच्याभोवती त्याच्या साथीदारांचा गराडा, घोषणाबाजी आणि हुल्लडबाजी करत मोटर सायकलच्या मिरवणुकीचे चित्रण करून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आले आहे. कायद्यावर विश्वास असलेल्या सामान्य ठाणेकरांसाठी नक्कीच ही बाब संताप आणणारी आहे. अशी चर्चा लोकांमध्ये पसरलेली आहे.


# कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीचे नाव अभिषेक यादव असे असून त्याच्यावर कापूरबावडी पोलिस ठाण्यात जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला जामीन मिळाल्याने तो बाहेर आला आहे.


# त्याच्या स्वागतासाठी कारागृहाबाहेर तरुणांना मोठ्या संख्येने घेऊन गेलेल्या गुंडाचे ठाण्यातील एका बड्या राजकीय नेत्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे समजते.


# काही महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीने पुण्यातील येरवडा कारागृहातून मारणे टोळी प्रमुखाची जामिनावर सुटका झाल्यानंतर कारागृहाबाहेर त्याच्या साथीदारांनी त्याची भव्य मिरवणूक काढली होती. फटाके वाजवले होते आणि या सर्वांचे चित्रीकरण करून या रिल्स सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल केल्या होत्या. पण पुणे पोलिसांनी तासाभरातच या म्होरक्याची रवानगी पुन्हा कारागृहात केली होती.


# सोशल मीडियावर धाक दाखवणारे, हुल्लडबाजी करणारे गुंडांचे रिल्स दिसताच पुणे पोलिसांनी अशा गुंडांच्या भर बाजारातून अर्धनग्न धिंड काढल्या होत्या. अनेकांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे ठाणे पोलिसही अशी कारवाई करणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.


# गंभीर गुन्हे करणाऱ्यांकडून रिल्स अथवा इतर माध्यमातून सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह बाबी व्हायरल केल्या असतील, ज्यामुळे दहशत पसरण्याची शक्यता असेल अशांवर गुन्हे दाखल करून पुढील कारवाई केली जाते. तर काही प्रकरणात संबंधितांना नोटीस बजावून समज दिली जाते.

- सुभाष बुरसे, पोलिस उप आयुक्त

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत