भारतीय मराठा महासंघाकडून ठाणे शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याची मागणी
विश्ववंदनीय हिंदूपदपादशहा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिन्दवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती समस्त हिंदूंचे स्फुर्तिदैवत हिंदवी स्वराज्याचे दुसरे पदपादशहा श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले महाराज यांच्या अतुलनिय शौर्याचे पोवाडे नेहमीच गायले जातात. त्यांचे शौर्य, त्यांचा पराक्रम हिंदू धर्मावरील त्यांची जाज्वल्य आणि कर्तव्यकठोर निष्ठा भारतवर्षातीलच काय पण पृथ्वीतलावरील कोणताही हिंदू धर्माभिमानी व्यक्ती विसरू शकणार नाही ! छत्रपती शिवरायांच्या अकाली निधनानंतर हिंदवी स्वराज्याची धुरा समर्थपणे पेलून अत्यंत बिकट परिस्थितीत मस्तवाल आणि धनाढ्य मोगल सम्राटांशी दोन हात करून स्वराज्याचे रक्षण करतांना छत्रपती संभाजीराजांनी निधड्या छातीने पत्करलेले वीरमरण आठवून आजही समस्त हिंदू समाजाच्या माना नतमस्तक होऊन संभाजी महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करतात, अशा या समस्त महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या महापराक्रमी आणि महाबलशाली हिंदू सम्राट श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा अश्वारूढ पुतळा आपल्या मराठी संस्कृतिसंपन्न ठाणे शहरात शहराच्या मध्यभागी त्वरित उभारण्यात यावा, जेणेकरून ठाणेकरांच्या आताच्या व यापुढील सर्व पिढ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ऊर्जा प्राप्त होईल अशी भारतीय मराठा महासंघाची आग्रही मागणी आहे !
आज दिनांक २२ जुलै २०२२ रोजी दुपारी प्रदेश अध्यक्ष श्री. महेश कदम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्याचे आमदार व सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री. संजय केळकर यांची भेट घेतली व या विषयाचा पाठपुरावा करून ठाणे शहरात स्वराज्याचे दुसरे छत्रपती हिंदू धर्मरक्षक श्रीमंत संभाजीराजे भोसले यांचा पुतळा योग्य इतमामात बसविण्यात यावा अशी मागणी केली. या मागणीला दुजोरा देतांना आमदार संजय केळकर यांनी सर्वप्रथम भारतीय मराठा महासंघाचे नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष श्री. महेश कदम यांचे अभिनंदन केले व भारतीय मराठा महासंघाच्या मागणीप्रमाणे छत्रपती संभाजीराजेंचा अश्वारूढ पुतळा ठाणे शहरात बसविण्यासाठी अग्रक्रमाने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्याबरोबरच ठाणे जिल्ह्यालाही ऐतिहासिक महत्व असून हा पुतळा बसविल्याने पुढील पिढीसाठी स्वराज्याच्या दैदीप्यमान वाटचालीतील संभाजीमहाराजांचे योगदान अवगत होण्याच्या दृष्टीने मदत होईल असेही प्रतिपादन श्री. संजय केळकर यांनी केले !
या भेटीप्रसंगी श्री. महेश कदम यांचे सोबत भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रवक्ते श्री. राजन गावंड, राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री. राम शिंदे, राष्ट्रीय सचिव श्री. राजेंद्र जगदाळे, राष्ट्रीय सदस्य श्री. संजय पाटील, ठाणे लोकसभा अध्यक्ष श्री. प्रसाद घोरपडे, नवी मुंबई शहर अध्यक्ष अॅड. श्री. अमोल उघाडे, श्री. शरद लोंढे, श्री अथर्व पवार व अन्य सदस्य उपस्थित होते.
Post a Comment