२१ व्या राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेत सिग्नल शाळेला १ सुवर्ण ३ रौप्य पदकं
ठाणे (प्रतिनिधी) – लाठी काठी अर्थात सिलंबम क्रिडा प्रकाराच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सिग्नल शाळेच्या चार मुलींनी दैदिप्यमान यश संपादन केले. शाळेच्या मुलींनी १ सुवर्ण व ३ रौप्य पदकांची कमाई केली. पुणे येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत २१ जिल्हयातील २६५ स्पर्धक सहभागी झाले होते. ठाणे महानगरपालिकेच्यावतीने अधिक्षक विजय साळवे यांनी सिग्नल शाळेत येऊन मुलींचा सत्कार केला.
स्व संरक्षणासाठी विविध राज्यात विविध नावांनी ओळखला जाणारा लाठी काठी हा क्रीडा प्रकार आता महाराष्ट्रात देखील शालेय पातळीवर मान्यताप्राप्त क्रिडा प्रकार म्हणून गणला जात आहे. तामिलनाडूत या क्रीडा प्रकाराचा विकास झाला. गेल्या २५ वर्षांपासुन महाराष्ट्रात देखील राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होत आहेत. यंदाची २१वी राज्यस्तरीय सिलंबन स्पर्धा पुणे, आळंदी येथे १९ जुलै ते २१ जुलै या दरम्यान संपन्न झाली. यात विविध २१ जिल्हयातील जवळपास २६५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
ठाणे महानगरपालिका पुरस्कृत व समर्थ भारत व्यासपीठ संचलित सिग्नल शाळेच्या चार मुली या स्पर्धेत यावर्षी सहभागाी झाल्या होत्या. यात गौरी पाथरकर हिने ३२ किलो वजनी गटात सुवर्ण तर ३७ किलो वजनी गटात हर्षदा कुडीया, ३० किलो वजनी गटात निलम देवले व ३५ किलो वजनी गटात सोनाली गायकवाड या तीघींनी रौप्य पदकाची कमाई केली. ठाणे जिल्हा लाठी काठी असोशिएशनचे अध्यक्ष बाळा साठे व दीपाली साठे यांच्या प्रशिक्षणाखाली सिग्नल शाळेतील मुलींना लाठी काठी या स्व संरक्षणाच्या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण गेली वर्षभर सुरू आहे. यंदा सिग्नल शाळेच्या मुलींनी या क्रीडा प्रकाराच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला व चार पदके पटकावलीत.
शिक्षण विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी विजेत्या स्पर्धकांचे कौतुक केले तसेच ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग अधिक्षक विजय साळवे यांच्या उपस्थितीत सिग्नल शाळेत देखील या मुलींच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीशी सामना करत शैक्षणिक तसेच क्रीडा स्पर्धात यश मिळविणा-या या मुली सगळ्यांसाठी आदर्श असल्याची भावना या सत्कार सोहळ्यात शिक्षण विभाग अधिक्षक विजय साळवे तसेच व्यासपीठाचे संचालक उल्हास कार्ले व सुरेंद्र वैदय यांनी व्यक्त केली. पुष्पगुच्छ, मिठाई व रोख रक्कम देऊन सिग्नल शाळेच्यावतीने मुलींचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुलींनी स्पर्धेतील अनुभव व्यक्त केले व इतर विदयार्थ्यांना स्पर्धेसाठी प्रेरित केले.
Post a Comment