शिक्षण विभाग (प्राथमिक) आयोजित पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कार्यशाळा संपन्न

 



शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी वी स्कूल ॲपचा वापर
-मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे


जि.प.ठाणे,- जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभाग (प्राथमिक) आयोजित पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कार्यशाळा Improving foundational literacy and numeracy (FLN) आज, दि. १९ जुलै रोजी पोलीस स्कूल ठाणे येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळत पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांना वाचन, लेखन‌ व गणित जलद गतीने करता यावे या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 


शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी, टिकवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील रहावे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आपण नवीन पद्धतीचा अवलंब करित जबाबदारीने व कर्तव्याने कामकाज करावे असे मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले. 


तसेच भविष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना सक्षम करणे गरजेचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वेगळी असते त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर लक्ष देऊन व विद्यार्थ्यांचे कौशल्य ओळखुन सर्वांगाने विकास करण्यासाठी काम करण्याची गरज आहे, ही अपेक्षा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केली. 


दर महिन्याला वी स्कूल ॲपद्वारे पडताळणी केली जाईल. विद्यार्थ्यांना वाचता, लिहिता येण्या संदर्भातील स्तर निश्चित करण्यात येईल. वी स्कूल ॲपमध्ये प्रत्येक महिन्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी स्तर निश्चित करण्यात आले आहे. शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करून देण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी प्रयत्नशील रहावे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले.


कार्यशाळेचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले. पुढील वर्षभर शिक्षण विभागातील कामकाज उत्तम पद्धतीने करण्यासाठी कार्यशाळा महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचे कामकाज शिक्षकांनी करायचे आहे असे प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी यांनी नमूद केले. 


यावेळी प्राचार्य डाएट, राहटोली डॉ. संजय वाघ, वोवेल्स ऑफ द पिपल असोशिएशन (Vowels of the people association) येथील डायरेक्टर प्रफुल्ल शशिकांत, उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित, उपशिक्षणाधिकारी वैशाली हिरडे, सर्व तालुकास्तरीय गटशिक्षणाधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, सर्व केंद्र प्रमुख, शिक्षक उपस्थित होते. 


जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या आगमनाने शिक्षण क्षेत्रात क्रांती होईल. विशेष लक्ष देऊन शिक्षण क्षेत्रात उत्तमरित्या काम करण्याची तयारी आपण करतोय. विद्यार्थ्यांना घडवणे म्हणजे त्याचं भविष्य घडवणे. विद्यार्थ्यांना घडवताना आपण प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची आहे असे प्रतिपादन प्राचार्य डाएट, राहटोली डॉ. संजय वाघ यांनी केले. 


VOPA येथील प्रफुल्ल शशिकांत यांनी वी स्कूल ॲप, लॉगइन, वापर याबद्दल सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ॲप व वेबसाईड वापर संदर्भातील माहिती उपस्थितांना दिली. 


विद्यार्थ्यांना शिकवताना किंवा मार्गदर्शक म्हणून काम करत असताना सातत्याने काम करणे ही आजची गरज आहे. शिक्षकांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध पध्दतीने विकास करणे गरजेचे आहे. शिक्षकांनी अनेक समस्यांवर मात करण्यासाठी चर्चा करून समस्यांचे निराकरण करावे असे मार्गदर्शन राज्य प्रशिक्षण समन्वयक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई तथा राज्य संयोजक वेध परिवार, महाराष्ट्र निलेश घुगे यांनी ऑनलाईन झुम मिटिंगमार्फत केले. 


कार्यशाळेचे सुत्रसंचलन गंगाराम ढमके यांनी केले. तसेच शहापूर तालुक्यातील प्राथमिक शाळेत राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी शिक्षकांनी दिली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत