कांदळवनावर मैदाने - बांधकामे; चौकशी समिती नेमून कारवाई ,आमदार संजय केळकर यांच्या प्रश्नावर वनमंत्र्यांची घोषणा.
ठाण्यातील कोलशेत, बाळकुम खाडीकिनारी कांदळवनावर भराव टाकून मैदाने झाली असून वसाहतीही बांधल्या आहेत. त्यामुळे फ्लेमिंगोसारख्या विदेशी पक्षांचा निवारा उठला असून निसर्गाची हानीही झाल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात केला. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशी समिती नेमून शिक्षेतही कठोरता आणण्याचे आश्वासन दिले.
आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात ठाणे शहरातील कांदळवन ऱ्हास, पर्यायाने होत असलेल्या निसर्गाच्या हानीचा मुद्दा उपस्थित केला. कोलशेत आणि बाळकुम भागात खाडीतील कांदळवन मातीभरावाने उद्ध्वस्त झाली असून येथे मैदाने तयार झाली आहेत. तर या आधी कांदळवन तोडून त्यावर बांधकामेही झाली आहेत. नागरीकरणामुळे येथे पूर्वी येणारे फ्लेमिंगोसारखे विदेशी पक्षी देखील येईनासे झाले आहेत तर निसर्गाचाही ऱ्हास झाला असल्याचे श्री.केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. याबाबत वन, महसूल आणि महापालिका एकमेकांकडे बोट दाखवून कारवाई टाळत आहेत. त्यामुळे भूमाफिया आणि तथाकथित विकासकांचे फावले असून काँक्रीटची जंगले वाढत आहेत, त्यामुळे या तीन पैकी एकाच विभागाकडे जबाबदारी निश्चित करण्यात यावी अथवा तिन्ही विभागांनी एकत्रित कारवाई करावी, अशी मागणी श्री.केळकर यांनी केली.
यावर उत्तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही ठिकाणी अधिकाऱ्यांना हाताशी धरून कांदळवनाचा ऱ्हास होत असल्याची कबुली दिली. या प्रकरणी आर्थिक दंड आकारण्याऐवजी शिक्षा भोगण्याची तरतूद करण्याची गरज व्यक्त केली. ठाण्यात कांदळवन उद्ध्वस्त करून त्यावर बांधकामे होत असतील तर आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणी चौकशी समिती नेमून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे श्री.मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

Post a Comment