कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल - शिवसेना महिला आघाडीचा युती सरकारला इशारा
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच लाडकी बहीण सुरक्षित नाही
ठाणे प्रतिनिधी - गेल्या २ वर्षापासून राज्यासह ठाणे जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. रस्त्यावर फिरताना महिलांचे जगणे मुश्किल झाले आहे. कावेरी नाखवा, अक्षता म्हात्रे आणि यशश्री शिंदे या महिलांचा नाहक बळी गेल्यानंतरही सरकारला अजून जाग आलेली नाही. एकामागून एक अशा दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. कायद्याचा धाक कोणाला राहिला नाही. त्यामुळे गुन्हेगार आपले राजकीय वजन वापरून पुन्हा मोकाट फिरत आहेत. अशा गुन्हेगारांचा खटला फास्टट्रॅक वर चालून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून भविष्यात होणाऱ्या अशा घटनेला आळा बसेल.
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच लाडकी बहीण सुरक्षित नसून आता कायदा हातात घ्यावा लागला तरी आम्ही ते करू असा थेट इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीने दिला. यावेळी महिलांनी युती सरकारच्या विरोधात काळी फीत लावून संताप व्यक्त करीत हल्लाबोल केला.
त्यावेळी महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, समिधा मोहिते, मा. नगरसेविका नंदिनी विचारे, अॅड. आकांक्षा राणे, प्रमिला भांगे, वैशाली शिंदे, ज्योती कदम, छाया अमृगम, अनिता प्रभू, वासंती राऊत, सुप्रिया गायकर, अॅड. आरती खळे, अॅड. पूजा भोसले, भारती गायकवाड, सायली साळवी, वंदना पवार व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Post a Comment