वसई व पालघरमध्ये महावितरणचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 

 


 

वसई/पालघर: महावितरणच्या वसई आणि पालघर मंडल कार्यालयांतर्गत आयोजित स्वतंत्र कार्यक्रमांमध्ये महावितरणचा १९ वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला. या दोन्ही कार्यक्रमांना कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांची विशेष उपस्थिती होती.

वसईतील महावितरणच्या कर्मचारी वसाहतीत वसई मंडल कार्यालयाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांना सन्मानचिन्ह प्रदान करून गौरवण्यात आले. तर आदर्श, स्वच्छ आणि सुरक्षिततेच्या निकषांवर प्रत्येकी तीन उपकेंद्रांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. महावितरणमध्ये कार्यरत अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी व त्यांच्या कुंटुंबियांनी सादर केलेल्या कलागुणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी अधीक्षक अभियंते संजय खंडारे, दीपक पाटील, दिलीप भोळे, वसई-विरार मनपाचे माजी पदाधिकारी नारायण मानकर, संदिप जाधव, वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजू माने यांच्यासह वसई मंडलातील अधिकारी, अभियंते, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.  

पालघर मंडलाचा वर्धापन दिन कार्यक्रम ओसवाल हॉलमध्ये झाला. नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी, अभियंते, अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनी या कार्यक्रमात सादर केलेल्या विविध गुणदर्शनाने उपस्थितांची वाहवा मिळवली. मुख्य अभियंता औंढेकर यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत गीत सादर करून उपस्थितांचा उत्साह द्विगुणित केला. यावेळी अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्यासह पालघर मंडल कार्यालयांतर्गत कार्यरत अधिकारी, अभियंते, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत