फतवा, धमक्यांना झुगारुन विजयासाठी मेहनत घेणाऱ्या कट्टर मुस्लिम कार्यकर्त्याचा खासदार नरेश म्हस्के यांनी केला सत्कार

 



भरघोस मतदान केल्याबद्दल मुस्लिम बांधवांचेही नरेश म्हस्के यांनी मानले आभार  


ठाणे, दि. १३ - लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करण्याचा फतवा मौलवींनी काढला होता. तर राबोडी विभागातील कट्टर शिवसैनिक असलेल्या डॉ. असगर मुकादम यांना धमक्या दिल्या गेल्या. मात्र कोणत्याही दबावाला बळी न पडता डॉ. असगर मुकादम यांनी दिवसरात्र एक करत महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या विजयासाठी मेहनत घेतली. खासदार नरेश म्हस्के यांनी आज डॉ. असगर मुकादम यांच्या दवाखान्यात जाऊन ऋण व्यक्त करत आभार मानले.  


लोकसभा निवडणुकीत यावेळी विरोधी पक्षाकडून जाती, धर्माचे विखारी राजकारण केले गेले. महायुतीच्या उमेदवारांविरोधात फतवे निघाले होते. राबोडी हा मुस्लिमबहुल विभाग आहे. दिवंगत आमदार मो. दा. जोशी यांचे शिष्य असलेले कट्टर शिवसैनिक डॉ. असगर मुकादम हे नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या विजयासाठी मेहनत घेत होते. मात्र त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. त्यांना बहिष्कृत करण्याचाही इशारा दिला गेला होता. या धमक्यांना भीक न घालता डॉ. असगर मुकादम यांनी नरेश म्हस्के यांचा प्रचार केला आणि चांगले मताधिक्य दिले.


नरेश म्हस्के यांनी आज डॉ. असगर मुकादम भेट घेतली तेव्हा मुकादम यांनी म्हस्के यांच्या कार्याचे कौतुक करत मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग्य उमेदवार दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. युवा सेनेचे नितीन लांडगे, शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल, शाखाप्रमुख निखिल बुडजडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. 


नरेश म्हस्के यांना मी गेली ३५ वर्षे ओळखत आहे. नरेश म्हस्के हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो त्यांच्यावर विश्वास टाकला आहे तो वाखाणण्यासारखा आहे. नरेश म्हस्के यांचे काम लक्षात घेऊन ठाण्यातील मुस्लिम समाजानेही त्यांना भरघोस मतदान केले आहे. नरेश म्हस्के आणि एकनाथ शिंदे यांनी कधीही एका समाज, धर्मासाठी काम केले नाही. त्यामुळेच मुस्लिम समाजाने आज या दोघांवरही विश्वास दाखवला आहे, असे असगर मुकादम यांनी यावेळी सांगितले.


डॉ. असगर मुकादम हा शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता राबोडी विभागात गेली अनेक वर्ष इमानेइतबारे निस्वार्थीपणे मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन पक्षाचे काम करत आहे. निवडणूक काळात मुस्लिम वस्त्यांमध्ये वातावरण गढूळ करण्याचे काम झाले. फतवे निघाले. मात्र डॉ. असगर मुकादम डगमगले नाहीत. शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्या सोबत डॉ. मुकादम यांनी मुस्लिम बांधवांचे मतपरिवर्तनाचे काम करत माझ्या विजयासाठी मेहनत घेतली. डॉ. असगर मुकादम  यांच्या सारखे अनेक मुस्लिम पदाधिकारी आणि कार्यकर्ते असून नरेश म्हस्के यांनी त्यांचे देखील आभार मानले. धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाती, धर्माचे राजकारण कधीच केले नाही. विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला मुस्लिम बांधवांनी मतदान केल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी मुस्लिम बांधवांचे जाहीर आभार यावेळी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत