हज यात्रेकरूंच्या 968 सेवेकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा !

 


*गुन्हा दाखल करण्यासाठी शानू पठाण यांची पोलीस ठाण्यात धडक* 


ठाणे -  हज यात्रा करण्यासाठी मक्का येथे जाणाऱ्या भाविकांना सेवा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सेवेकऱ्यांची गरज भासते. या सेवेकऱ्यांना चांगले मानधन मिळत असल्याने ठराविक कालावधीसाठी गोरगरीब बेरोजगार तरूण मक्केत जात असतात. मात्र, या सेवेकऱ्यांना कोट्यवधी रूपयांचा गंडा घालून एक जण फरार झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून गोरगरीब तरूणांचे पैसे परत करावेत, अशी मागणी करीत मुंब्रा पोलीस ठाण्यात धडक दिली. 


सौदी अरेबियातील मक्का येथे हजयात्रेला जगभरातून मुस्लीम बांधव जात असतात. कोट्यवधी भाविक या ठिकाणी एकत्र येत असल्याने नागरी सेवा देण्यासाठी सौदी सरकारला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागत असते. त्यासाठी काही एजन्सी अशा पद्धतीने मनुष्यबळ पुरवत असतात. बंगळुरू येथील एक एजन्सी अशाच पद्धतीने सेवेकरी सौदी अरबमध्ये पाठवत असते. त्यासाठी आपले कमिशन म्हणून एका बेरोजगार तरूणाकडून सुमारे 65 हजार रूपये आकारत आहे. या एजन्सीचा मुंब्रा येथील दलाल मोहम्मद आदिल आणि त्याचे साथीदार रफत सैय्यद,   रोनक परवीन,  शेहबाज शाहनवाज सैय्यद, मोहम्मद रफिक,  मोहम्मद हनीफ गौडा यांनी  व्हिसा, सौदी येथील निवासखर्च यासाठी मुंब्रा येथील सुमारे 300 तरुणांकडून प्रत्येकी 65 हजार या प्रमाणे 1 कोटी 95 लाख रूपये उकळले आहेत. तर सबंध महाराष्ट्रातून 968 तरुणांकडून 6 कोटी 29 लाख 20 हजार रूपये उकळून पोबारा केला आहे. ही एजन्सी बंगळुरू येथे असून या एजन्सीने देशभर असा घोटाळा केला असल्याचा संशय मा. विरोधीपक्ष  नेते शानू पठाण यांनी व्यक्त केला आहे. 


रविवारी शानू पठाण यांनी फसवणूक झालेल्या 300 तरूणांना घेऊन मुंब्रा पोलीस ठाणे गाठले. तिथे जाऊन त्यांनी संबधित भामट्यावर गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. त्यांनी या संदर्भात पोलीस उपायुक्तांशीही चर्चा केली. सध्या दिसत असलेला हा घोटाळा हिमनगाचे एक टोक असून देशभरातील बेरोजगार तरूणांची फसवणूक झालेली असून अशी फसवणूक झालेल्यांनी पोलिस आणि आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. 

दरम्यान,  पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे मुंब्रा पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत