ओवळा माजिवाडा आणि मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना मोठे मताधिक्य देणार - आमदार प्रताप सरनाईक
मिरा रोड, - ठाणे लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा क्षेत्र येत असून ओवळा माजिवडा आणि मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघांतून नरेश म्हस्के यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊ, असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी निवडणूक प्रचारानिमित्त ओवळा माजिवाडा आणि मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील भाजपा नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या तेव्हा आमदार प्रताप सरनाईक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी आमदार गीता जैन, नरेंद्र मेहता, रवींद्र फाटक, विधानसभा निवडणूक प्रमुख रवी व्यास, भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा, 145 विधानसभा प्रमुख रवी व्यास, युवा सेनेचे पूर्वेश सरनाईक आणि शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास झाला आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याला प्रगतीपथावर नेले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ठाणे आणि मिरा भाईंदर शहरातील अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत. नरेश म्हस्के हे ठाण्याचे माजी महापौर आहेत. त्यांना प्रशासनातील दांडगा अनुभव आहे. असा उमेदवार संसदेत खासदार म्हणून गेला तर या दोन्ही शहरांचा विकास होईल. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातून त्यांना मोठे मताधिक्य देण्यासाठी मेहनत घेऊया, असे आवाहन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच खासदार म्हणून नरेश म्हस्के यांना मोठ्या मतांच्या फरकाने निवडून आणण्यासाठी भाजप कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत असल्याचे, आमदार गीता जैन यांनी सांगितले.
Post a Comment