31 मार्चपूर्वी मालमत्ता कर भरणा करण्याचे नागरिकांना आवाहन

 


      मालमत्ता कर हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या महसूलाचा महत्वाचा स्त्रोत असून मालमत्ताकरामार्फत प्राप्त होणा-या निधीतून विविध नागरी सुविधा कामे करण्यात येत असतात. त्यादृष्टीने मालमत्ताकर वसूलीचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी नियोजनबध्द पावले उचलण्यात येत आहेत.

      याकरिता 29 फेब्रुवारी 2024 रोजीच जाहीर करण्यात आलेल्या ‘मालमत्ताकर अभय योजना’ अंतर्गत 21 मार्चपासून 31 मार्च 2024 पर्यंत थकीत मालमत्ता करासह शास्तीची केवळ 50% रक्कम भरणा करावी लागणार आहे. म्हणजेच शास्तीच्या रक्कमेत 50 टक्के सूट मिळणार आहे. त्यामुळे मालमत्ताकर अभय योजनेचा लाभ घेऊन नागरिकांनी थकीत मालमत्ताकरावरील शास्तीच्या रक्कमेत भरीव सूट प्राप्त करुन घ्यावी असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे नागरिकांनी आपला विद्यमान मालमत्ताकर 31 मार्चपूर्वी विहित वेळेत भरुन शहर विकासास हातभार लावावा असेही आवाहन करण्यात येत आहे.

नागरिकांना आपला मालमत्ताकर सुलभ रितीने भरणा करता यावा यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रे तसेच मालमत्ताकर भरणा केंद्रे 31 मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत कार्यरत राहणार असून नागरिक नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या घरातूनच ऑनलाईन करभरणा करू शकतात.

तरी थकित मालमत्ताकर धारकांनी अभय योजने अंतर्गत शास्तीवर 50 टक्के सवलत मिळवावी व आपला थकित मालमत्ताकर भरणा करावा त्याचप्रमाणे विद्यमान वर्षाच्या मालमत्ताकराचा भरणाही 31 मार्चपूर्वी करावा आणि शहर विकासाला हातभार लावावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत