'उत्सव मराठी भाषेचा' सुलेखन प्रदर्शनातून नवी मुंबईत मराठी भाषेचा गौरव
अत्यंत ऐश्वर्यसंपन्न अशा मराठी भाषेचा गौरव व्हावा आणि मराठी भाषेची महती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, विशेषत्वाने नव्या पिढीला याचे महत्त्व कळावे व मराठी भाषेची गोडी वाढावी यादृष्टीने सुलेखनाच्या आकर्षक माध्यमातून मराठी भाषेचा बहुमान केला जात असल्याचे सांगत सुप्रसिद्ध सुलेखनकार श्री.अच्युत पालव यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत 24 तास विनामूल्य खुले राहणाऱ्या या सुलेखन प्रदर्शनाला मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावी असे आवाहन केले.
27 फेब्रुवारी रोजीच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी यांच्या सहयोगाने 24 ते 28 फेब्रुवारी 2024 या कालावधीत वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सार्वजनिक चौक या भागामध्ये आयोजित 'उत्सव मराठी भाषेचा' या खुल्या सुलेखन प्रदर्शनाच्या शुभारंभप्रसंगी त्यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधला.
नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या शुभहस्ते या प्रदर्शनाचा शुभारंभ संपन्न झाला. याप्रसंगी परिमंडळ 1 विभागाचे उपायुक्त श्री. सोमनाथ पोटरे, सुलेखनकार श्री. अच्युत पालव, जनसंपर्क अधिकारी श्री. महेंद्र कोंडे, अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.अण्णासाहेब टेकाळे, कलावंत सर्वश्री अशोक पालवे व श्रीहरी पवळे आणि सुलेखनकार कलावंत व मराठी भाषा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुलेखनकार श्री. अच्युत पालव हे नवी मुंबई शहराचे भूषण असून शहर सुशोभिकरणाचे राजदूत आहेत. स्वच्छता व सुशोभिकरणासह महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांत त्यांचे सक्रिय योगदान असून मराठी भाषेच्या गौरवासाठी त्यांनी राबविलेला हा सुलेखन उपक्रम नागरिकांमध्ये मराठी भाषा विषयक प्रेम वाढवेल असा विश्वास उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी शुभारंभप्रसंगी व्यक्त केला.
विशेष म्हणजे यावेळी श्री.अच्युत पालव यांनी 'निश्चय केला, नंबर पहिला' हे महानगरपालिकेचे ध्येयवाक्य सुलेखनातून मोठ्या कागदावर रेखाटत मराठी राजभाषा गौरव दिनाच्या शुभेच्छाही सुलेखनातून सर्वांना दिल्या. अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफीचे प्रशिक्षणार्थी श्री. शशिकांत गवंडे व श्रीम. तृप्ती माने फुरिया यांनीही सुलेखनाद्वारे मराठी भाषेची महती आकर्षक अक्षरलेखनातून प्रकट केली.
ज्यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो अशा कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रसिद्ध कविता या प्रदर्शनामध्ये रसिकांना लक्षवेधी सुलेखनातून अनुभवयास मिळणार असून अनेक दिग्गज कवी, लेखकांचा अक्षर साहित्याचा अनुभव याठिकाणी रसिकांना घेता येणार आहे.
सुलेखन म्हणजे काहीतरी आगळेवेगळे आहे हा समज डोक्यातून काढून टाकून नागरिकांनी हे सुलेखन प्रदर्शन बघावे आणि सुलेखनाचे विशेष प्रशिक्षण न घेतलेल्या आपल्यासारख्याच सर्वसामान्यांनी साकारलेल्या या सुलेखानाचा आस्वाद घ्यावा आणि आपलेही अक्षर सुंदर असावे हा ध्यास घेऊन सुलेखन करावे असेही आवाहन यावेळी श्री अच्युत पालव यांनी केले.
या प्रदर्शनामध्ये सुप्रसिद्ध सुलेखनकार श्री.अच्युत पालव यांच्यासह श्रीकांत गवंडे, श्वेता राणे, अनिता डोंगरे, तेजस्विनी भावे, अमृता अमोदकर, तृप्ती माने फुरिया, हर्षदा साळगांवकर, यतिन करळकर, प्रसाद सुतार, मनिषा नायक, पूजा गायधनी, रूपाली ठोंबरे, निलेश गायधनी, रोहिणी निंबाळकर, रसिका कोरगांवकर, वैशाली अधिकारी यांनी सुलेखनातून कविता व मराठी साहित्यकृतींतील वाचनीय उतारे आकर्षक रितीने अक्षरालंकृत केलेले आहेत.
नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी यांच्या सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित 'उत्सव मराठी भाषेचा' हे खुले सुलेखन अक्षर प्रदर्शन वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 28 फेब्रुवारीपर्यंत 24 तास खुले असणार असून नागरिकांनी आपल्या मुलांसह याठिकाणी आवर्जून भेट देऊन मराठी भाषेची संपन्नता अनुभवावी असे आवाहन करण्यात येत आहे.
Post a Comment