मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात सर्वंकष स्वच्छता मोहिमेत झाली रस्ते आणि नालेसफाई

 


ठाणे महापालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम (#DeepCleaningCampaning) 
       
            




ठाणे  : मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत (#DeepCleaningCampaning) शनिवारी मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात साफसफाई करण्यात आली. मुंब्रा अग्निशमन केंद्र येथून या सफाई मोहिमेस आरंभ झाला. या मोहिमेत मुख्य रस्ते, पदपथ, अंतर्गत रस्ते, नाले यांची सफाई करण्यात आली. तसेच, अग्निशमन केंद्रासमोरील रस्ते दुभाजकांमध्ये वृक्षारोपणही करण्यात आले.

        
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या या मोहिमेत रस्ते साफ करणे, पाण्याने धुणे, पदपथ सफाई, रस्ते दुभाजक स्वच्छ करणे, नाले सफाई, उद्यान सफाई यांचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत शनिवारी मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात आयोजित केलेल्या सर्वंकष स्वच्छता अभियानास स्थानिक नागरिकांही प्रतिसाद दिला.

        
या मोहिमेत सफाई कर्मचा-यांसोबत महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, उपनगर अभियंता कार्यशाळा गुणवंत झांबरे, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे तसेच महापालिका अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

         
 सकाळी ६.१५ वाजता मुंब्रा अग्निशमन केंद्र येथे या मोहिमेस आरंभ झाला. मुंब्रा प्रभागातील आत्माराम चौक, रेती बंदर, दत्तवाडी. मुंब्रा स्टेशन परिसर, मुंब्रा मार्केट, मुंब्रा बायपास, न्यू मित्तल रोड, स्टेडियम रोड, गुलाब पार्क मार्केट परिसर, किस्मत कॉलनी परिसर, कादर पॅलेस वसाहत, ठाकूरपाडा, संजय नगर, आनंद कोळीवाडा, बाबाजी पाटील वाडी, शंकर मंदिर परिसर, अमृतनगर वसाहत येथील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते यांची साफसफाई करण्यात आली. मुख्य रस्ते, पदपथ झाडून पाण्याने स्वच्छ करण्यात आले. रस्त्यावरील दुभाजक स्क्रबरच्या साहाय्याने घासून नंतर पाण्याच्या फवारणीने स्वच्छ धुण्यात आले. परिसरातील रस्त्यांंबरोबरच लहान-मोठे नालेही स्वच्छ करण्यास सुरूवात झाली.

        
या स्वच्छता मोहिमेस आरंभ झाल्यानंतर, अतिरीक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांच्या हस्ते अग्निशमन केंद्रासमोरील रस्ते दुभाजक सुशोभीत करण्यासाठी तेथे वृक्षारोपण करण्यात आले. रस्ते, पदपथ सफाईसोबतच धूर फवारणी, औषध फवारणीही करण्यात आली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत