घोडबंदर रोड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वैष्णवी प्रतिष्ठानचा यावर्षीचा महाराष्ट्र महोत्सव ०४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान रंगणार
ठाणे . ठाणे महानगरातील घोडबंदर रोडवासियांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी, प्रतिक्षा आणि उत्सुकता असणारा घोडबंदर रोड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वैष्णवी प्रतिष्ठानचा यावर्षीचा महाराष्ट्र महोत्सव यावर्षी दि. ०४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत येथील मुच्छाला पॉलीटेकनिक कॉलेजच्या मागे असलेल्या महापालिकेच्या मैदानात सायं. ०७ ते रात्रौ १०. ०० या वेळेत रंगणार आहे. या भव्य महाराष्ट्र महोत्सवाचे यंदाचे ९ वे वर्ष असल्याचे या महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ओवळा माजिवडा विधानसभा संपर्कप्रमुख आणि वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश मणेरा यांनी यंदाच्या महाराष्ट्र महोत्सवाबद्दल माहिती देतांना सांगितले.
०४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी, २०२४ पर्यंत आठ दिवस चालणाऱ्या या महाराष्ट्र महोत्सवात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम, विविध स्पर्धा, खाद्यपदार्थ व वस्तूंचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. दि. ०४ फेब्रु. रोजी शाहीर रामानंद उगले व सहकाऱ्यांचा "महाराष्ट्र गाथा", दि. ०५ फेब्रु. रोजी शाल्मली सुखटणकर, निरुपमा डे आणि नचिकेत देसाई यांचा "स्वर आशा", दि. ०६ फेब्रु. रोजी आशिष देशमुख, विवेक पांडे, राजेश्वरी पवार आणि संज्योती जगदाळे यांचा "इश्क सुफियाना", दि. ०७ फेब्रु. रोजी प्रणव रावराणे यांचा खेळ-गाणी, हळदीकुंकू आणि महिलांच्या आवडत्या पैठणी खेळाचा "फुल टू धिंगाणा", दि. ०८ फेब्रु. रोजी महाराष्ट्र महोत्सव श्री", दि. ०९ फेब्रु. रोजी के शिरीष, मोना कामत, आणि अंकिता ब्रम्हे यांचा "मेलडीज ऑफ दि नाईनटीज" हा जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम, दि. १० फेब्रु. रोजी सुशील पाटील व मेघा साळवी यांच्या परीक्षणाखाली "नृत्य स्पर्धा" आणि दि. ११ फेब्रु. रोजी सुप्रसिद्ध गायक विश्वजित आणि गायिका पारुल यांचा "विश्वजित आणि पारुल लाईव्ह" असे विविध धम्माल व मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार असल्याची माहिती नरेश मणेरा यांनी दिली.
या भव्य महाराष्ट्र महोत्सवाच्या कालावधीत शिवसेना नेते व आमदार आदित्यजी ठाकरे , शिवसेना नेते व खासदार सर्वश्री संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, राजन विचारे, शिवसेना नेते व आमदार भास्कर जाधव, महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे हे भेट देणार आहेत.
विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांबरोबरच, नृत्य स्पर्धा, शरीर सौष्ठव स्पर्धा आणि महिलांचा पैठणीचा खेळ, विविध खाद्यपदार्थ व वस्तूंचे स्टॊल्स तसेच भव्य आकर्षक प्रवेशद्वार, नेत्रदीपक सजावट व विद्युत रोषणाई हि या महाराष्ट्र महोत्सवाची वैशिष्ट्ये असून या भव्य महाराष्ट्र महोत्सवाची तयारी या महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजक शिवसेना ठाकरे गटाचे ओवळा मजीवडा विधानसभा संपर्कप्रमुख आणि वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश मणेरा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली येथील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक करीत आहेत.

Post a Comment