मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार ग्रॅण्ड सेंट्रल पार्कचे लोकार्पण
शुक्रवारपासून सर्वसामान्यांसाठी होणार खुले
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कोलशेत येथे तयार करण्यात आलेल्या ग्रॅण्ड सेंट्रल पार्कचे लोकार्पण मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज, गुरुवार, ०८ फेब्रुवारी रोजी दु. २.०० वाजता होणार आहे. कल्पतरू समुहाने विकसित केलेले हे २०.५ एकर जागेवरील ग्रॅण्ड सेंट्रल पार्क शुक्रवार, ०९ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे.
या कार्यक्रमास सर्वश्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, अजित पवार, उपमुख्यमंत्री, कपिल पाटील, राज्य मंत्री, पंचायत राज मंत्रालय, भारत सरकार, शंभूराज देसाई, मंत्री राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा, रवींद्र चव्हाण, मंत्री सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण हे विशेष अतिथी आहेत. खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार कुमार केतकर, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रमोद पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
गुरूवारी लोकार्पण झाल्यानंतर हे ठाण्यातील सगळ्यात मोठे उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. कोलशेत येथे कल्पतरू पार्कसिटीमध्ये सुमारे २०.५ एकरवर तयार करण्यात आलेल्या ग्रँड सेंट्रल पार्कची संकल्पना मा. मुख्यमंत्री महोदयांची आहे. या उद्यानात सुमारे ३५०० विविध प्रकारची झाडे आहेत. तर, उद्यानात पक्षी आणि फुलपाखरांच्या १०० पेक्षा जास्ती जातीचा अधिवास येथे आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांसाठी हे उद्यान आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. त्यात, मुघल, चिनी, मोरोक्कन आणि जपानी अशा चार पद्धतीचे संकल्पनेवर आधारित उद्यानेही आहेत. मुलांसाठी खेळायला भरपूर जागा, जॉगींग ट्रॅक, सर्वात मोठे स्केटींग यार्ड, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल कोर्ट या सुविधाही या उद्यानात आहेत.

Post a Comment