महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आयोजित गड-किल्ले स्पर्धेचा १९ फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरण सोहळा
ठाणे, - छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील बांधलेले गड-किल्ले म्हणजे तमाम मराठी जनतेचा स्वाभिमान आहे. गड-किल्ले बांधणीबाबतचा महाराजांचा दृष्टीकोन, बांधणीचे कौशल्य आजच्या पिढीला कळावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने गड-किल्ले यांची प्रतिकृती स्पर्धेचे आयोजन दिवाळीमध्ये केले होते. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी १९ फेब्रुवारी रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जनकल्याणकारी दूरदृष्टीचा आणि दुर्दम्य इच्छाशक्तीचा जागर करण्याचा संकल्प महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. दीपावली निमित्त दरवर्षी गड-किल्ले यांची प्रतिकृती बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावेळी ठाण्यातील ४६८ समूहातील तरुणांनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेत भाग घेतला. सुमारे २५०० पेक्षा जास्त तरुण-तरुणी या स्पर्धेत सहभागी झाली होती. आपआपल्या घरा शेजारी, इमारती खाली महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड किल्ल्यांची प्रतिकृती बनविण्यात आली होती.
या प्रतिकृतीचे चित्रण, छायाचित्र ऑनलाईन मागविण्यात आले होते. दुर्ग अभ्यासकांनी त्याचे परिक्षण केले. आता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ १९ फेब्रुवारी ला शिवजयंती च्या दिवशी मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रथम पारितोषिक ५१००० रूपये, द्वितीय २१००० रूपये, तृतीय ११००० रूपये तसेच २५ किल्ल्यांना उत्तेजनार्थ अशी एकूण २ लाखांची बक्षिसे स्पर्धकांना देण्यात येणार आहेत. यावेळी गड किल्ले स्पर्धेतील सहभागी कलाकारांच्या प्रतिकृती छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा नृत्यविष्कार यावेळी सादर करण्यात येणार आहे.
गड किल्ले संवर्धन करणाऱ्या दुर्गवीर संस्थेचे संतोष हासुरकर आदी मान्यवरांचे मार्गदर्शन यावेळी होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून इतिहास अभ्यासक सदाशिव टेटविलकर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला मनसे नेते आमदार राजू दादा पाटील, मनसे नेते अभिजीत पानसे , मनसे नेते अविनाश जाधव, मनविसे सरचिटणीस गजानन काळे, सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे , मनविसेचे अखिल चित्रे, यश सरदेसाई,चेतन पेडणेकर,संतोष गांगुर्डे, सायली सोनावणे यांची उपस्थिती असणार आहे.

Post a Comment