ड्राय वेस्ट बँक उपक्रमात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 300 हून अधिक विदयार्थ्यांचा सन्मान
स्वच्छतेचा मंत्र आपल्या कृतीतून पटवून देणाऱ्या व कीर्तनासारख्या प्रभावी माध्यमातून स्वच्छतेचे महत्व् मनामनात रुजविणाऱ्या संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून आज घनकचरा व्यवस्थापन विभाग तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या माध्यमातून ड्राय वेस्ट बँक या अभिनव उपक्रमात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विदयार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता विषयक उपक्रम राबविताना नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच नाविन्यपूर्णता आणण्यावर भर दिला आहे. यामध्ये शालेय स्तरावर राबविण्यात येणाऱ्या ड्राय वेस्ट बँक या अभिनव उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला असून या माध्यमातून विदयार्थ्यांमध्ये कचरा कमी करण्याचे संस्कार होताना दिसत आहेत.
ड्राय वेस्ट बँक या उपक्रमांतर्गत शालेय विदयार्थी आपल्या घरातून टेट्रापॅक, बॉटल, चॉकलेट व गोळयांचे रॅपर, सॅशे इत्यादी कचरा सुक्या कचऱ्यात न टाकता शाळेत घेऊन येतात. शाळेमध्ये विदयार्थ्यांनी जमा केलेल्या सुक्या कचऱ्याच्या प्रमाणात त्यांना पॉईंटस् देण्यात येतात व सर्वाधिक पॉईंटस् जमविणाऱ्या विदयार्थ्यांना बक्षिस स्वरुपात शालेय साहित्य प्रदान करुन सन्मानित केले जाते. याकरिता शिक्षकांकडे उपक्रमात सहभागी झालेल्या विदयार्थ्याचे स्वच्छता पासबुक देण्यात आलेले असून त्यामध्ये विदयार्थ्याने जमा केलेल्या सुक्या कचऱ्याच्या तुलनेत पॉईंट्सची नोंद केली जाते.
सदयस्थितीत बेलापूर, नेरुळ, वाशी या तीन विभागातील 15 शाळांमध्ये राबविला जाणारा हा उपक्रम सर्वच शाळांमध्ये टप्याटप्याने राबविण्याचे नियोजन आहे. या 15 शाळांमधील 2771 विदयार्थी या उपक्रमात सहभागी असून यामधील 300 हून अधिक सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विदयार्थ्यांना बेलापूर येथील विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
सीबीडी बेलापूर येथील वारकरी भवनमध्ये संपन्न झालेल्या ड्राय वेस्ट बँक उपक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त् तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी उत्तम कामगिरी करुन पारितोषिकाचे मानकरी ठरलेल्या विदयार्थ्यांचे कौतुक करीत या उपक्रमातील आपले चांगले काम इतर विदयार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल असे सांगितले. महापालिका आयुक्त् श्री. राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम आगामी शैक्षणिक वर्षात टप्प्याटप्प्याने सर्वच शाळांमध्ये राबविण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
Post a Comment