चला जाणूया नदीला या अभियानाअंतर्गत विविध कामांचा कृती आराखडा तयार करावा – अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे
ठाणे : 'चला जाणूया नदीला' या अभियानातंर्गत ठाणे जिल्हृयातील उल्हास नदी, वालधुनी, कामेरी, कुंभावरी या नद्यांमध्ये होणारे प्रदुषण नियंत्रित करुन तेथील अतिक्रमणे हटवणे, वृक्षारोपण करणे, जनजागृती करणे व या अनुषंगाने कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी उपस्थित महापालिका व नगरपरिषदांच्या प्रतिनिधींना दिले.
जागतिक पाणथळ दिनाचे औचित्य साधून (2 फेब्रुवारी) रोजी ठाणे जिल्ह्यातील महापालिका व नगरपरिषदांची जिल्हास्तरीय बैठक ठाणे महानगरपालिका मुख्यालयात पार पडली या बैठकीस महापालिका तसेच नगरपरिषदांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच या कार्यशाळेत राज्य शासनाद्वारे नियुक्त अभियान समन्वयक प्रा. डॉ. स्नेहल दोंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
नद्यांचे होणारे प्रदुषण कमी करणे, नदीचे संवर्धन करणे, त्याबाबत जनसंवाद करणे यासाठीचा कृती आराखडा करुन त्याची अंमलबजावणी करणे, नदी संवर्धन उपक्रम हे चला जाणूया नदीला या अभियानाचा मूळ उद्देश आहे. शासनाच्या 2018 च्या निर्णयानुसार हरित लवादाच्या आदेशान्वये राज्यात नदी पुर्नरुत्थान समिती स्थापन करण्यात आली. तद्नंतर 2022 च्या शासनान्वये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव अंतर्गत चला जाणुया नदीला अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन झालेली असून या समितीची ही दुसरी बैठक ठाणे महापालिकेत पार पडली.
नद्यांचे व जलस्त्रोतांचे पर्यावरणपूरक संवर्धनाकरिता अधिकतम नैसर्गिक संसाधनांचा वापर करणे गरजेचे असल्याचे प्रा.डॉ. स्नेहल दोंदे यांनी नमूद केले. तसेच जलप्रदुषण रोखण्याकरिता सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या नैसर्गिक व पर्यावरणपूरक संसाधनाबाबत माहिती त्यांनी दिली, तसेच सदर अभियान अत्यंत प्रभावीपणे व परिणामकारकरित्या राबविले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. यावेळी बैठकीस उपस्थित असलेल्यांचे स्वागत उपआयुक्त अनघा कदम व मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी केले तर उपपर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांनी सर्वांचे आभार व्यक्त करुन कार्यक्रमाचा समारोप केला.
.jpeg)
Post a Comment