17 आणि 18 फेब्रुवारी रोजी ठाणे येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन

 

 


नवी मुंबई  :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता आयुक्तालय यांच्यावतीने दि.17 आणि 18 फेब्रुवारी,2024 रोजी ठाणे येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे  आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. 


या बैठकीस कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी ठाणे अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी रायगड डॉ.योगेश म्हसे, कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त श्री.दि.दे.पवार तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 


ठाणे येथे होणाऱ्या महारोजगार मेळाव्यासाठी मोठया प्रमाणात रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उद्योजक संस्था, संघटना, औद्योगिक कंपन्या, रोजगार देणाऱ्या संस्था, यांच्याशी समन्वय साधून मोठया प्रमाणावर बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्योजक नोंदणी आणि रिक्त पदे अधिसूचित करणे यासोबतच विविध उद्योजक संघटनांना यामध्ये सामावून घेतले जाणार आहे. मेळाव्यात येणाऱ्या संस्था आणि बेरोजगार तरुणांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडप आणि अन्य व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. महारोजगार मेळाव्याच्या पूर्व व नंतरच्या प्रसिध्दीसाठी विशेष नियोजन केले जात आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत