ब्रह्मानंद प्रतिष्ठानच्या महोत्सवातून दिव्यांगांचे क्रीडागुण झळकले
शारीरिक कमतरता असणा-या विशेष मुलांमध्येही विशेष गुण असतात या बाबीकडे प्राधान्याने लक्ष देत त्यांच्यामधील अंगभूत क्रीडागुणांना उत्तेजन देण्याच्या दृष्टीने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यांग क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बौध्दीक अपंगत्व असलेल्या 150 हून अधिक विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभागी होत आपल्यातील क्रीडा कौशल्याचे दर्शन घडविले.
स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठानला या दिव्यांग कल्याणकारी उपक्रमाच्या आयोजनामध्ये एल अँड टी तंत्रज्ञान सेवा समुहाने सामाजिक बांधिलकी जपत सीएसआर मधून सहकार्य केले होते. या महोत्सवामध्ये प्रतिष्ठानमधील दिशा, फाल्गुनी आणि सीबर्ड या तीन युनिटमधील बौद्धिक अपंगत्व असलेल्या 150 हून अधिक विद्यार्थ्यांनी धावणे, सॉफ्ट बॉल थ्रो, स्टँडिंग लाँग जंप, कमी क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे मजेदार खेळ आणि क्रिकेट मॅच अशा विविध उपक्रमांमध्ये उत्साही सहभाग घेतला.
या उपक्रमांचे नियोजनच अशा प्रकारे करण्यात आले होते की त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागी होण्याची संधी मिळावी. यात सर्व पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांना पदके आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
विशेष म्हणजे याप्रसंगी आंतरराष्ट्रीय विक्रमवीर सागरी साहसी जलतरणपटू शुभम वनमाळी उपस्थित होते. ज्यांना लहानपणी शिक्षण घेताना आकलनातील कमतरतेमुळे अनेक आव्हानांना तोंड दिले होते. आणि पुढे त्यांनी सागरी जलतरणाच्या क्षेत्रात जिद्दीने स्वत:ला सिध्द केले आणि स्वकर्तृत्वाने देशातील सर्वात मानाचा तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय पुरस्कार संपादन केला. अशा दिव्यांगत्वावर मात करून पुढे आलेल्या खेळाडूच्या उपस्थितीमुळे प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली.
नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी आणि राष्ट्रीय मानांकित शुटींगबॉलपटू श्री. रेवप्पा गुरव यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम्समधील आंतरराष्ट्रीय स्पर्धकांनी आणलेल्या मशाल मार्चने सुरूवात करण्यात आली.
सीबीडी बेलापूर येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न राजीव गांधी क्रीडासंकुलात संपन्न झालेल्या या दिव्यांग क्रीडा महोत्सवात शेल इंडिया सोबत काम करणारे तसेच मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन त्यामध्ये जमा होणारा निधी प्रतिष्ठानच्या शाळेला देणारे के.सतीश, फादर ॲग्नेल शाळेचे क्रीडा शिक्षक लक्ष्मण सिंग ठाकूर आणि इतर मान्यवर विविध जबाबदा-या पार पाडून सहभागी झाले होते. दिव्यांग मुलांचा खेळाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे या उद्दिष्टासाठी आयोजित करण्यात आलेल्या या दिव्यांग क्रीडा महोत्सवातून विद्यार्थ्यांना आनंद तर दिलाच, त्यासोबतीने आत्मविश्वासही दिला.
.jpeg)
Post a Comment