ठाणे महापालिकेचे आयुक्त संवेदनशील - मेधाताई पाटकर
सरकारी अधिकाऱ्यांना बाबत अनेकांचे मत चांगले असतेच असे नाही. नर्मदा बचाओच्या नेत्या मेधाताई पाटकर यांनाही अनेकदा अनेक अधिकाऱ्यांबाबत असाच अनुभव आलेला असणार. ठाणे महानगरपालिका आयुक्तांबाबत मात्र त्यांना वेगळाच अनुभव आला आहे. आयुक्त अभिजीत बांगर हे अभ्यासू आणि अत्यंत संवेदनशील अधिकारी असल्याचे त्यांना वाटते आहे. याबाबत त्यांनी स्वतः ठाण्यात श्रमिक जनता युनियन संघाच्या निर्धार मेळाव्यात हे मत व्यक्त केले.
मेधाताई पाटकर या श्रमिक जनता युनियन संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यानुसार ठाण्यातील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या आणि समस्या घेऊन त्या ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ठाण्यातील विविध विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या व्यथा आयुक्तांसमोर मांडल्या. ठेकेदारांकडून होत असलेली त्यांची आर्थिक आणि श्रमिक पिळवणूक कथन केली. तसेच या समस्येतून कंत्राटी कामगारांची सुटका करावी अशी विनंती केली. त्यावर आयुक्त बांगर यांनी मेधाताई पाटकर यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून ठेकेदाराने कंत्राटी कामगारांना न्याय दिला नाही तर त्यांचा ठेका रद्द करा अशा सूचना केल्या. आयुक्तांचे असे कौतुक मेधाताई पाटकर यांनी कंत्राटी कामगारांसमोर केले. गुरुवारी (ता४) दुपारी चार वाजता त्या ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालय येथे आयोजित केलेल्या जाहीर निर्धार मेळाव्यात बोलत होत्या. यावेळी मंचकावर उपाध्यक्ष संजय मंगल गोपाळ, सरचिटणीस जगदीश खैरालिया आदी मान्यवर उपस्थित होते. आयुक्तांनी कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबद्दल सकारात्मकतेसोबतच अर्थसंकल्पात देखील याबाबत बाजू मांडून असे आश्वासन दिले. तसेच महापालिकेत सध्या नगरसेवक नसल्याने लोकांचे, कामगारांचे प्रश्न प्रलंबित राहू नयेत म्हणून ते प्रश्न मांडण्याची बाजू लोकांना, कामगारांना संधी द्यावी आणि त्याचे प्रक्षेपण फेसबुकवर लाईव्ह करावे, मेधाताई पाटकर यांच्या या मागणीवरही आयुक्तांनी सकारात्मकता दाखवली. त्यामुळेच हे आयुक्त मला संवेदनशील आणि कामगारांचे प्रश्न सोडवणारे वाटले असे मेधाताई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.

Post a Comment