ठाण्यातील निराधार ज्येष्ठांना राममंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने गोडधोड जेवण
अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन आणि प्रभू रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने देशभरात लोकांच्या घरात गोडधोड अन्न बनले असतानाच ठाण्यातील निराधारांनाही अशा मिष्ठान्नाचा आस्वाद घेता आला. के व्ही सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून निराधारांना विशेष जेवण्याचे डबे पुरवण्यात आले. या निराधारांमध्ये जेष्ठ एकल नागरिक, विधवांचा समावेश आहे.
२२ जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन झाले. देशभरातील तमाम जनतेने हा सोहळा उत्सव म्हणून साजरा केला. घर घरात गोडधोड जेवणाची मेजवानी होती. मात्र त्याचवेळी ठाण्यातील काही निराधारांना जेवण मिळेल की नाही याची शास्वती नव्हती. परंतु ठाण्यातील के व्ही सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हरेश गोगरी यांनी वागळे इस्टेट परिसरातील लोकमान्य नगर, साठे नगर, राम नगर, हनुमान नगर, कैलास नगर, सी पी तलाव, जूनागाव आदी ठिकाणी राहणाऱ्या निराधारांना पोटभर जेवता येईल असे प्रत्येकाला डबे दिले. या जेवणाच्या डब्यात छोले पुरी, खीर, ढोकळा, जिरा राईस, दही, केळी आदी पदार्थांचा समावेश होता. हरेश गोगरी आणि माधुरी पाटील हे या परिसरातील निराधारांसाठी कायम झटत असतात. वर्षभर एकही दिवस न चुकता ते त्यांना जेवणाचा डबा मोफत पुरवत असतात. गेली ११ वर्षांपासून ते ही सेवा बजावत आहेत. त्यान्वये २२ जानेवारी रोजी झालेल्या राममंदिर उद्घाटन आणि प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या आनंदामध्ये नागरिकांनी विशेष जेवण बनवले होते. त्यामुळे ट्रस्टच्या वतीने देखील या परिसरातील ७५ निराधारांना विशेष जेवणाचे डबे देण्यात आले.
ज्या ज्येष्ठ नागरिकांना कोणीही नाही. अशा नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी के व्ही चॅरिटेबल ट्रस्ट काम करते आहे. गेल्या ११ वर्षापासून ज्यांना कोणाचाही आधार नाही अशांना मी ही सेवा देत आहे. त्यांना रोज जेवण दिले जाते. सण, उत्सवाच्या दिवशी जेवणात गोडधोड पदार्थ असतात. राम मंदिर उद्घाटन सोहळा हा सुद्धा सणासारखा साजरा केल्याने, या दिवशी आम्ही या निराधार नागरिकांना गोडधोड जेवण दिले.
- हरेश गोगरी, संस्थापक अध्यक्ष, केव्ही सेवा चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे.

Post a Comment