चला जगूया सेकंड इनिंग ठाण्यात सुरू आहे 'आजीबाईंची शाळा'
शिक्षणाची आवड असेल तर कोणत्याही वयात ते घेता येते. अगदी हाच धागा पकडून ठाण्यातील शांती नगरात राहणाऱ्या ६० ते ८० वर्षांच्या १७ आजीबाई दप्तर घेऊन शाळेत जात आहेत. बाल वयात पाटीवर पेन्सिलने अक्षरे गिरवण्याचे राहून गेल्याने आता त्या या वयात शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. आजिबाईंच्या किलबिलाटाने येथील वातावरण आनंदी झाले आहे. त्यांची ही अनोखी शाळा 'आजीबाईंची शाळा' म्हणून ओळखली जाते.
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात असलेल्या शांतीनगरात एका लहानशा गाळ्यामध्ये गेल्या चार महिन्यापासून आजीबाईंचा किलबिलाट ऐकू येत आहे. या गाळ्यात परिसरात राहणाऱ्या १७ वृद्ध महिला पूर्व प्राथमिक शिक्षण घेत आहेत. १७ जणींचा हा वर्ग मंगळवार आणि शनिवार असा आठवड्यातून दोनदा भरतो आहे. त्यांच्या शाळेला त्यांनी आजीबाईंची शाळा असे नाव दिले आहे. शाळेत येणाऱ्या सर्व आजीबाई मोठ्या आनंदाने हातात पाटी आणि पेन्सिल घेऊन अ आ इ ई ..ची अक्षरे गिरवणे शिकत आहेत. दुपारी ४:०० ते ५:३० च्या दरम्यान भरणाऱ्या या वर्गात एका सुरात अक्षरे, पाढे मोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकू येतो. एक तास अक्षरांची ओळख, पाटीवर गिरवणे सुरू असते. तर शेवटच्या अर्ध्या तासात गाणी, ओव्या आदी सुरू असते. त्यांना शिकवणाऱ्या माधुरी पाटील नावाच्या शिक्षिका वयाने त्यांच्यापेक्षा निम्म्या असल्या तरी मॅडम लिहिताना, बोलताना आमचे काही चुकले तर आमच्यावर रागवा, आम्हाला शिक्षा करा, आम्ही तुमचे विद्यार्थीच आहोत, आम्हाला काहीच वाईट वाटणार नाही', असे त्या सांगतात. त्यामुळे हा वर्ग म्हणजे लहान वयातील मुलांची शाळाच असल्याचा भास होतो आहे. अगदी तशाच पद्धतीचे हलकेफुलके वातरण येथे दिसते. जयश्री फाउंडेशनच्या माधुरी पाटील आणि के. व्ही. सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे हरेश गोगरी यांच्या माध्यमातून ही शाळा सुरू आहे.
या वयात त्यांना आवश्यक असलेली अक्षरे लिहिता वाचता यावीत, स्वतःचा पूर्ण पत्ता सांगता यावा, मोबाईल नंबर सांगता यावा, वृत्तपत्र वाचता यावे अशा पद्धतीचे शिकवले जाते.
डिजिटल युगाची त्यांनाही ओळख व्हावी, अँड्रॉइड मोबाईल कसा वापरायचा, त्यातील सोशल मीडियाचा कसा वापर करायचा हेही शिकवले जाते.
त्यांच्या काळातील ओव्या म्हणणे, इतर गाणी बोलणे, बालवयात जे जे करायचे राहून गेले ते ते या वर्गात करण्याचा प्रयत्न केला जातो. या वर्गात कोणी प्रतिष्ठित व्यक्ती आली तर अगदी शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे त्या एकसाथ नमस्ते असे म्हणत त्यांचे स्वागत करताना दिसतात.
चार महिन्यापूर्वी दोन आजीबाईंना घेऊन सुरू केलेल्या या वर्गात दोनचे चार आणि त्यानंतर थेट १७ विद्यार्थिनी झाल्या आहेत. आणखी आजिबाईंना प्रवेश घ्यायचा आहे. त्यांना लहान वयात शाळेत जात आले नाही ती इच्छा येथे पूर्ण होत आहे. अगदी शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे इथले वातावरण असते. असे आणखी अनेक वर्ग सुरू करायचे आहेत. ठाणे महापालिकेने त्यांच्या शाळेत अशा वर्गाची सुविधा उपलब्ध करून दिली तर आजीबाईंच्या शाळेचा हा पसारा नक्कीच वाढेल. यातून मिळणाऱ्या आनंदाने त्या खूष राहाव्यात, त्यांना जगण्याची उमेद मिळावी हाच यामागील हेतू आहे.
Post a Comment