अवैध मद्यविक्रीची "झिग' उतरवली एका महिन्यात 1 कोटी 33 लाखांचा साठा जप्त
राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाने विनापरवाना दारू विक्री, निर्मिती आणि वाहतूक करणाऱ्यांची चांगलीच झिग उतरवली. या विभागाने एका महिन्यात तब्बल चार लाख 21 हजार लिटर दारू जप्त केली. जप्त केलेल्या दारूची किंमत एक कोटी 31 लाख 32 हजार रुपये एवढी असून या गुन्ह्यात 287 जणांना अटक केली आहे.
विनापरवाना दारूची विक्री, वाहतूक आणि निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांच्या आदेशाने कार्यकारी विभाग आणि भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकांच्या माध्यमातून अशा गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवले जाते. यान्वये डिसेंबर महिन्यात ठाणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात दारू साठा जप्त केला आहे. यामध्ये हातभट्टी आणि रसायन युक्त दारूचा मोठा समावेश आहे. पथकाने केलेल्या कारवाईत चार लाख 18 हजार 170 लिटर रसायनिक दारू पकडली. 1547 लिटर हातभट्टी जप्त केली. मैने भरात एकूण 401 गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यात 287 जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या विनापरवाना दारू विक्रीमध्ये 464 लिटर देशी दारू, 184 लिटर विदेशी दारू, 303 लिटर बियर, 72 लिटर परराज्यातून येणारी दारू आणि 310 लिटर ताडी - माडीचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेली दारू 4 लाख 21 हजार 050 लिटर असून या दारूची किंमत 1 कोटी 33 लाख 32 हजार 55 असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेली 15 वाहने देखिल जप्त करण्यात आली. 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 या एका महिन्यातील ही कारवाई आहे. अशी माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांच्या आदेशाने भरारी पथक तैनात करण्यात आले आहे. अनधिकृतपणे दारू विक्री, वाहतूक व निर्मिती करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते. ठिकठिकाणी नाकाबंदी असते. 31 डिसेंबर साठी येणाऱ्या दारू साठ्यावर पथकाचे विशेष लक्ष होते. त्यानुसार प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. चोख बंदोबस्तामुळे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
-निलेश सांगडे, अधीक्षक

Post a Comment