नवी मुंबईत बंजारा भवनसाठी जागा निश्चित, एआयबीएसएसच्या मागणीला यश
मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कारसाठी भव्य मेळावा घेणार : डॉ शंकर पवार
ठाणे (प्रतिनिधी ) : ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्यावतीने (एआयबीएसएस) गेल्यावर्षी १६ ऑक्टोबर २०२२ रोजी ठाण्यातील ढोकाळी हायलँड येथे भव्य बंजारा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंजारा समाजाला त्यांचे हक्काचे भवन देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्य सरकारने बंजारा समाजाचे भवन उभारण्यासाठी नवी मुंबईतील बेलापुर सेक्टर २१ - २२ मध्ये अपोलो हॉस्पिटलजवळ जागा निश्चित झाली आहे. त्यामुळे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्यावतीने घेण्यात आलेल्या मेळाव्याला यश आले आहे. यासंदर्भात एआयबीएसएसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शंकर पवार यांना विचारले असता ते म्हणाले, बंजारा समाजाच्यावतीने आभार म्हणून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
महाराष्ट्रातील बंजारा समाज आणि देशातील विविध भागातून ठाणे, मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या बंजारा समाजाचे प्रश्न आणि त्यांना येणाऱ्या विविध समस्या यावर प्रकाश टाकण्यासाठी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकर पवार यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील ढोकाळी हायलँड भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचे भव्य सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये हजारोच्या संख्येने बंजारा समाज सहभागी झाला होता. त्यानंतर मंत्रालय आणि मुख्यमंत्री निवासस्थानी बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी एआयबीएसएसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शंकर पवार, कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विविध बैठका घेतल्या. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवी मुंबईत गोर बंजारा सामाजिक भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या यश संदर्भात ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शंकर पवार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आम्ही आभार मानतो. देशभरातुन विविध भागातून आलेल्या बंजारा समाजाला आपले विविध कार्यक्रम करण्यासाठी मुंबईत हक्काची जागा मिळवून दिली म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी ठाण्यात लवकरच बंजारा समाजाचा भव्य मेळावा घेणार असल्याचे डॉ शंकर पवार यावेळी म्हणाले.

Post a Comment