गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करा -जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
जिल्हाधिकारी कार्यालयात कायदा व सुव्यवस्थेचा आढावा; डीजेचा वापर टाळण्याचे, ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळण्याचे आवाहन
ठाणे(जिमाका): गणेशोत्सव अत्यंत शांततेत, सुरक्षित आणि उत्साही वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था, गणेश मंडळे आणि नागरिकांनी परस्पर समन्वय राखून सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत ते बोलत होते. सर्वांनी मिळून हा उत्सव यशस्वीपणे साजरा करावा, असे आवाहन करताना त्यांनी विविध विभागांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना दिल्या.
उत्सवादरम्यान डीजेचा वापर पूर्णपणे टाळावा, असे स्पष्ट निर्देश देत जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनी प्रदूषण नियंत्रणावर विशेष भर दिला. रुग्णालय, शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात शांतता राखली जावी यासाठी अधिक काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यासंदर्भात आवश्यक त्या सूचना सर्वांना द्याव्यात आणि दररोज ध्वनी प्रदूषणाविषयी व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असेही ते म्हणाले.
यंदा १५ सप्टेंबर, १८ सप्टेंबर, १९ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबर या चार दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यासाठी अतिरिक्त वेळेची मुभा देण्यात आली असून, इतर सर्व दिवशी मात्र रात्री १० ची वेळेची मर्यादा सर्वांसाठी बंधनकारक राहील.
वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेताना गर्दीची ठिकाणे, वाहतुकीची महत्त्वाची ठिकाणे आणि मिरवणूक मार्गांवर वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले. यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे, पोलीस तपासणी काटेकोर करावी आणि वाहतूक नियमनासह अन्य सुरक्षेसाठी होमगार्ड तसेच नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांची मदत घ्यावी. रेल्वे स्थानक परिसरातील गणेश मंडळांनी वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा रीतीने मंडप उभारावेत, तसेच मिरवणूक मार्गांवरील रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करून घ्यावी, अशा सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.
संपूर्ण उत्सव काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही यासाठी महावितरणने विशेष खबरदारी घ्यावी, तसेच विसर्जनाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व व्यवस्था चोख ठेवावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या मूर्ती आणण्यावर भर द्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच किंवा गृहनिर्माण संस्थांच्या (सोसायटी) आवारातील व्यवस्थेनुसारच करावे. भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी सर्व सोयीसुविधांनी युक्त तात्पुरती आरोग्य सेवा केंद्रे उभारली जावीत. याशिवाय सामाजिक बांधीलकी म्हणून गणेश मंडळांनी या कालावधीत जास्तीत जास्त रक्तदान शिबिरे आयोजित करावीत आणि मंडळांनी नागरिकांशी नियमित सुसंवाद साधावा, असेही नमूद करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ. संतोषी शिंदे, नायब तहसीलदार सुरेश महाला यांच्यासह पोलीस विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग आणि विद्युत विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. नियमांचे काटेकोर पालन करून गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment