Folowers

ठाणे महानगर पालिकेच्या नोकरभरतीत ठामपा हद्दीतील ठाणेकर उमेदवारांनाच संधी द्या

 

राष्ट्रवादी (श.प.) चे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांची मागणी

ठाणे - ठाणे महानगर पालिकेतील 381 फायरमन आणि इतर प्रशासकीय व तांत्रिक पदांसह 1 हजार 773 जागांसाठी मेगा भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरतीसाठी 60 ते 70 हजार जणांनी अर्ज दाखल केले आहेत. शहराबाहेरूनही मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. मात्र, शहराबाहेरील उमेदवारांना ठाण्याबद्दल आत्मियता असण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे पोटार्थींची नोकरभरती करण्याऐवजी ठामपा हद्दीत जन्माला आलेल्या ठाणेकर तरूण - तरूणींनाच या नोकरभरतीमध्ये संधी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. यासंदर्भात  त्यांनी उपायुक्त,  मुख्यालय यांना निवेदन दिले आहे. 


ठाणे महानगर पालिकेच्या नोकर भरतीसाठी 12 ऑगस्ट 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार ठाणे एकूण १,७७३ जागांसाठी परीक्षा प्रक्रिया सुरू केली आहे. ही परिक्षा टीसीएस या कंपनीमार्फत घेतली जाणार असली तरी तिथेही माणसेच असल्याने गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या नोकरभरतीवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ठाणे महानगर पालिकेत सध्या सर्वच पातळ्यांवर "खाबूगिरी" धोरणाचीच अंमलबजावणी होत आहे. त्याचा फटका ठाण्यातील कर्तबगार तरूणांना बसणार आहे. काही वर्षांपूर्वी ठाणे महानगर पालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने कोल्हापूर आणि औरंगाबाद येथील तरूणांना ठाणे महानगर पालिकेत चालक आणि आरक्षक म्हणून भरती करून घेतले होते. त्यानंतर स्वतःची बदली होण्यापूर्वीच या सर्वांना बढती देऊन लिपीक पदावर स्थानापन्न केले होते. त्यांच्या या कृतीमुळे ठाण्यात जन्माला आलेल्या कर्तबगार तरुणांवर एक प्रकारे अन्यायच झाला होता. ठामपातील मुख्य सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी नोकरभरतीत स्थानिकांनाच प्राधान्य देण्यात येईल, असे म्हटले होते. मात्र, सध्या तरी तसे होत असल्याचे दिसून येत नाही. सध्या ठाणे पालिकेचे अनेक अधिकारी हे पालिकेचे मालक असल्यासारखे वागत आहेत. त्यांच्या या वागणुकीमुळेच शहराचा बट्ट्याबोळ झाला आहे. आता पुन्हा या नोकरभरतीत आपल्या जिल्ह्यातील तसेच आपल्या आप्तस्वकियांना प्राधान्य देण्याच्या हालचाली करीत माजी अतिरिक्त आयुक्ताच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप प्रधान यांनी केला. 


दरम्यान, ३८१ फायरमनसह सुरू असलेल्या १,७७३ जागांच्या भरतीमध्ये ठाण्यात जन्माला आलेल्या तरूण-तरूणींना संधी देणे अधिक गरजेचे आहे. ठाणेकर असल्याने या लोकांना ठाणे शहराबद्दल आत्मियता असेल अन् या आत्मियतेतून ठाणे शहराला न्याय  देताना हे आपला हात आखडता घेणार नाहीत. याचा विचार करून ठाणे पालिकेच्या नोकरभरतीत ठाणेकरांना म्हणजेच स्थानिकांना अन् काही काळ ठामपाच्या विविध आस्थापनांमध्ये काम केल्याचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी प्रधान यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत